कोल्हापूर - रामनवमी निमित्त कागल येथील श्री राम मंदिर येथे विरेंद्रसिंहराजे घाटगे आणि श्रेयादेवी घाटगे यांच्या हस्ते पूजा पार पडली. दरवर्षी मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जाते. मात्र, यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने आणि घाटगे कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात श्रीराम जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आज श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्यासह मंदिर परिसरातील सर्वच मूर्तींची आकर्षक पूजा बांधली होती. यावेळी शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे सुद्धा उपस्थित होते.
कोरोनाचे संकट दूर व्हावे -
कोरोनामुळे पुन्हा एकदा सर्वकाही ठप्प झालं आहे. शिवाय लाखो लोकांचे मृत्यू झाले त्यामुळे जागतिक महामारीचे हे मोठे संकट लवकर दूर व्हावे आणि जनजीवन पुर्वपदावर येऊदे अशी राम चरणी प्रार्थना केल्याचे समरजित घाटगे यांनी म्हंटले. यावेळी श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, नंदितादेवी घाटगे, नवोदिता घाटगे, आर्यविरराजे घाटगे या राजपरिवारातील सदस्यांसह मोजके भाविक उपस्थीत होते.