कोल्हापूर - शहरालगत असणाऱ्या बलिंगा गावाच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावाशेजारी असणाऱ्या भोगावती नदीच्या पात्रात जैववैद्यकीय कचरा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यात वापरलेल्या सीरिंजचा समावेश आहे. येथूनच शेजारील दहा गावांसह कोल्हापूर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
नागरिकांच्या जीवाशी खेळ
नागरिकांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सकाळी ही घटना उघड झाली. सुदैवाने, पुलाच्या खांबाच्या दुरुस्तीसाठी टाकलेल्या मुरुमावर सुयांचा ढीग टाकला आहे. बालिंगा, नागदेववाडी, हणमंतवाडी, शिंगणापूर, खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वरणगे, चिखली, आंबेवाडी व शहराला पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो.
हेही वाचा - प्लास्टिक मणी तयार करणाऱ्या कारखान्याला भीषण आग
वापरलेल्या पोतंभर सुया थेट पात्रात
कचऱ्यामुळे दूषित पाणी थेट पिण्यासाठी जाते. यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार सुरू आहे. पहाटेपासून सकाळी आठपर्यंत परिसरात दाट धुके होते. धुक्याचा फायदा घेत अनोळखी व्यक्तीने वापरलेल्या पोतंभर सुया थेट पात्रात टाकल्या. ग्रामपंचायतीच्या वतीने या सुया गोळा केल्या. या सुया प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताब्यात देणार असल्याची माहिती दिली.
खासगी डॉक्टर किंवा अन्य कोणी हा जैव कचरा टाकला त्याची ग्रामपंचायत व आरोग्य विभागामार्फत बॅच नंबर तपासून चौकशी करून कारवाई करू, अशी ग्वाही प्रभारी करवीर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मोरे यांनी दिली आहे.
नदीच्या काठावर कचरा टाकला जातो
दरवेळी नदीच्या काठावर कचरा टाकला जातो. यावर कोणाचाच वचक नाही. आता तर थेट नदीपात्रात जैविक कचरा टाकला आहे. हा नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. याबाबत दोन वेळा आंदोलने केली. यावर कठोर पावले उचलली नाहीत तर, तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील यांनी दिला आहे.
हाकेच्या अंतरावर पाणी उपसा केंद्र
बलिंगा पाणी उपसा केंद्रावरून पाणी उपसा केला जातो. इथून आजूबाजूचे गावे व अर्ध्या शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र काही वाईट प्रवृत्तीने थेट नदी पत्रात जैविक कचरा टाकल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. असे प्रकार वारंवार घडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! वसईमध्ये आईनेच केली दीड महिन्याच्या मुलीची हत्या