कोल्हापूर - ज्या पद्धतीने राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न शिवसैनिकांनी साकार केले. त्याच पद्धतीने कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिवसेनेचा महापौर करण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले असून कोणत्याही परिस्थितीत महापालिकेत सेनेचाच महापौर करणार, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. शिवाय 'हीच ती वेळ, शिवसेनेचा महापौर करण्याची' या घोषवाक्याद्वारे महापालिका निवडणुकीत सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांबरोबरच मंत्री सुद्धा निवडणुकीत सक्रिय होणार
पत्रकार परिषदेत राजेश क्षीरसागर म्हणाले, गेल्या महिन्याभरात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना संपर्कमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्याने शिवसेना निवडणूक पूर्ण ताकतीने आणि शिवसेनेचाच महापौर करण्याच्या इराद्याने लढणार असल्याचे संकेत दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख यांच्या आदेशाने पक्षातील वरिष्ठ नेते आणि मंत्री सुद्धा कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विशेष करून सक्रिय होणार आहेत. शिवसेना ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढणार असून भविष्यात सेनेचा मुख्यमंत्री असल्याने मोठ्या प्रमाणात कोल्हापूरसाठी निधी खेचून आणण्यामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले.
या निवडणुकीत सेनेसाठी पोषक वातावरण
राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे संयमी आणि कुशल नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्र राज्याने मान्य केले आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा शिवसेनेसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. म्हणूनच शिवसेनेकडे इच्छुक उमेदवारांची संख्या सुद्धा वाढत चालली आहे. आमच्याकडे अनेकजण संपर्कात असल्याचे सांगत इतर पक्षातील काही इच्छुक सेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यास त्यांना सुद्धा पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल असेही क्षीरसागर यांनी यावेळी म्हटले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नंदकुमार मोरे, राहुल चव्हाण, रियाज खान, महेश उत्तुरे, यांच्यासह देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, माजी परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, तेजस्विनी इंगवले, ऋतुराज क्षीरसागर, अभिषेक देवणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा - शेजारच्यांचा पेटलेला ऊसाचा फड विझवताना शेतकऱ्याचा होरपळून जागीच मृत्यू