कोल्हापूर - पुलवामा मधील हल्ल्याची जखम अजून ताजी आहे. सीमेवरच्या दहशतवाद्यांच्या कारवाया अजून थांबलेल्या नाहीत. संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. आजही देशभरातील व्यापाऱ्यांनी बंद पाळून पुलवामा मधील हल्ल्याचा निषेध केला आहे. असे असताना कोल्हापुरात मात्र, एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. तो म्हणजे महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकाची सभापतीपदी झालेल्या निवडीचा जल्लोष होय.
एकीकडे कोल्हापुरात शहिदांवरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला आहे. व्यापारी दुकाने बंद ठेवून हातावर हात ठेवून बसलेत. नेहमी गजबजणारा महाद्वार रोडवर ही शांतता आहे. अशातच दुसरीकडे ढोल ताशाचा आवाज सुरू झाला. काही तरुण गुलालाची उधळण करत होते. फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. हे सगळे चित्र दिसत होते ते महानगरपालिकेच्या परिवहन सभापतीपदी नियुक्ती झाल्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या जल्लोषाचे.
आज (सोमवारी) शिवसेनेचे नगरसेवक अभिजित चव्हाण यांची परिवहन सभापतीपदी नियुक्ती झाली. पण त्यानंतर जो जल्लोष झाला तो पुलवामामधील हल्ल्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा होता. विशेष म्हणजे ज्या गाडीसमोर हा जल्लोष सुरू होता, त्या गाडीला वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहणारी काही पोस्टर लावण्यात आले होते. हे दृश्य तर कल्पनेच्या पलिकडचे असल्याची चर्चा यावेळी परिसरात सुरू होती.
सभापतीपदी नियुक्ती झाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यास कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, सभापती साहेब आजची ती वेळ नक्कीच नव्हती. कारण आजही सीमेवर आपले जवान जीवाची बाजी लावत आहेत. त्याचवेळी जर दुसरीकडे असा जल्लोष होत असेल तर तो सर्वसामान्य नागरिकांनाही न आवडणारा असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात होती.
सभापती नियुक्ती झाल्यानंतर हे पद पुलवामात वीरमरण आलेल्या जवानांना समर्पित करुन कामाला सुरुवात केली असती तर सगळ्यांनीच कौतुक केले असते. पण तसे न होता आनंदाच्या भरात ढोत ताशाचा गजर केला. हे कुणालाही आवडणारे नाही. त्यामुळेच हा देश माझा आहे, याचे भान जरासे राहू द्या, अशाही प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.