कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजेच 6 जून. यंदाच्या वर्षापासून "शिवस्वराज्य दिन" साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज (रविवार) 6 जून रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सकाळी 9 वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते 'शिवशक राजदंड स्वराज्य गुढी' उभारण्यात आली. जिल्हा परिषदमध्ये प्रथमच असा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला. शिवरायांवर आधारित पोवाडे, शिवरायांच्या वेशभूषेतील अधिकारी, कर्मचारी यामुळे अवघा जिल्हा परिषद परिसर शिवमय झाला होता. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील जनतेला शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्र्यांकडून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा
इतिहासातील सुवर्णसोहळ्याचा साक्षीदार असलेला शिवराज्याभिषेक दिन आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मंगलमय दिवस म्हणजे 6 जून 1674. याच दिनी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि राजे 'छत्रपती' झाले. आजपासून दरवर्षी 6 जून हा दिवस शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असे म्हणत पालकमंत्री सतेज पाटील यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
पंचायत समिती, ग्रामपंचायतमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या प्रांगणात 'शिवशक राजदंड स्वराज्य गुढी' उभारण्यात आली. जिल्हा परिषद कोल्हापूर येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शिवराज्यभिषेक सोहळा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, मर्दानी खेळ प्रात्यक्षिक, पोवाडा सादरीकरण पार पडले. तसेच शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या चित्रकर्त्या डॉ. अल्पना चौगुले यांचा सत्कार तसेच कोविड योध्दा सुरेश निंबा देशमुख, परिचर यांच्या वारसांना शासनाने मंजूर केलेल्या 50 लाख रुपयांचा धनादेश सुद्धा वितरण करण्यात आला. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिक्षण सभापती प्रवीण यादव महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, समाज कल्याण सभापती बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.