कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातसुद्धा आता शिवभोजन थाळीची सुरुवात होणार आहे. यासाठी इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी आपले अर्ज तहसीलदार कार्यालय, राधानगरी येथे तत्काळ सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार मीना निंबाळकर यांनी केले आहे.
राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात ‘शिवभोजन’ उपलब्ध करून देण्यासाठी राधानगरी तालुक्यामध्ये शिवभोजन थाळी सुरू करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. तालुक्यातील सद्यस्थितीत सुरू असलेल्या खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यापैकी इच्छुक तसेच सक्षम असलेल्या व्यक्तींनी आणि संस्थांनी आपले अर्ज द्यावेत. हे अर्ज तहसीलदार कार्यालय राधानगरी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरात गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून काही ठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आहे. त्याठिकाणी गरजू लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊन काळातही अनेक गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी सुरू होती. त्याचा अनेकांना फायदा झाला आहे. आता राधानगरीमध्ये सुद्धा थाळी सुरू होणार असल्याने अनेकांनी याचे स्वागत केले आहे.