कोल्हापूर- कोरोना संसर्गामुळे सर्वच क्षेत्रात मंदीची लाट आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पहिले एक वर्ष शैक्षणिक शुल्क वाढ न करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने मंगळवारी जाहीर केला.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क भरणे शक्य नसल्याने विद्यापीठ अधिकार मंडळाने याबाबत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. संलग्न महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या विविध विनाअनुदानित अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष २०२०- २१पासून सुधारित करण्यात आलेले शैक्षणिक शुल्क वाढीसाठी एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व राज्य सहसंचालक शिक्षण विभाग यांच्या पत्राच्या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे अध्ययन व अध्यापनाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबतची कार्यवाही सुरू करावी, असेही शिवाजी विद्यापीठाच्या वतीने संलग्न महाविद्यालय व संस्थांना अन्य एका परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले. यामुळे शिक्षण कशाप्रकारे सुरू ठेवायचे याचा पेच सुटला आहे.