कोल्हापूर: राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. राज्यपालांना कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला निमंत्रण देण्यात आले आहे. या दीक्षांत समारंभाला त्यांना कोणत्याही परिस्थितीत बोलवू नये, अन्यथा सेनेच्या पद्धतीनेच त्यांना आम्ही रोखू अशापद्धतीचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे. आज विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जेलभरो आंदोलन करत त्यांनी हा इशारा दिला आहे. आमचा विरोध असूनही जर राज्यपाल इथे आले तर दीक्षांत समारंभ कार्यक्रम उधळून लावू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
ठाकरे गटाचे आंदोलन : राज्यपालांना भगतसिंह कोश्यारी यांना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला बोलू नये, या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन केले. विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिवसैनिकांनी तीव्र घोषणाबाजी करत प्रवेशद्वाराच्या गेटवर चढून विद्यापीठात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापटीही झाली. यावेळी पोलिसांनी आक्रमक आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेतले.
कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी: आंदोलकांनी यावेळी छत्रपती शिवरायांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. 'राज्यपाल चले जाओ'च्या घोषणा सुद्धा दिल्या. दरम्यान, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दीक्षांत समारंभासाठी आमंत्रण दिल्याचे समजताच कोल्हापुरातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
पदवी स्विकारू नका : विद्यापीठ प्रशासनाला राज्यपाल कोश्यारी यांना निमंत्रण देऊ नये शिवाय त्यांना कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरात प्रवेश देऊ नये, या संदर्भातील निवेदन ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यानंतर युवा सेनेने सुद्धा आक्रमक होत विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. जे राज्यपाल सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात, शिवाय महापुरुषांबद्दल सुद्धा वारंवार चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतात अशा राज्यपालांच्या हस्ते आपण पदवी स्वीकारू नये, अशा पद्धतीचे आवाहन सुद्धा युवा सेनेकडून करण्यात आले होते.
जेलभरो आंदोलनाचा इशारा : अजूनही विद्यापीठ प्रशासनाने याबाबत कोणताही निर्णय जाहीर न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या या शिवसैनिकांनी आज जेलभरो आंदोलनाचा इशारा विद्यापीठ प्रशासनाला दिला होता. त्यानुसार आज विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती शिवसैनिकांकडून जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.
हेही वाचा : Narayan Rane criticized Aditya Thackeray In Pune: आदित्य ठाकरेंचे नाव घेऊ नका, मला उपवास करावा लागेल - नारायण राणेंचा पुण्यात टोला