कोल्हापूर: दुर्गराज रायगड येथे जाऊ न शकलेल्या शिवप्रेमींसाठी कोल्हापुरातील शिवराज्याभिषेक सोहळा पर्वणी ठरली. सकाळी साडेसात ते दहा या वेळेत नवीन राजवाड्याच्या प्रांगणात सनई चौघडा वादनाने शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. यानंतर 8 वाजता झांज पथक आणि साडेआठ वाजता मराठा लाइट इन्फंट्री बँड बेळगाव यांचे सादरीकरण झाले.
छत्रपतींचा अभिषेक: सकाळी 9 वाजता शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि याज्ञसेनिराजे छत्रपती महाराणीसाहेब, मालोजीराजे छत्रपती, मधुरीमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्यासह करवीर जनतेच्या उपस्थित अभिषेक करण्यात आला. या सोहळ्यानंतर पोवाडा, शौर्य गीत, मराठी स्फूर्ती गीत आणि मर्दानी खेळांचा थरार देखील अनुभवायला मिळाला.
शिवरायांची सुवर्णमूर्ती मुख्य आकर्षण: स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चांदीच्या मूर्तीवर जलाभिषेक करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. त्याचप्रमाणे कोल्हापुरात पहिल्यांदाच करवीर संस्थानातील नवीन राजवाडा येथे शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर जलाभिषेक करण्यात आला. शिवरायांची ही सुवर्णमूर्ती करवीरकरांचे मुख्य आकर्षण ठरली.
ढोल ताशांचा गजर: पहिल्यांदाच कोल्हापुरातील ऐतिहासिक नवीन राजवाडा येथे शिवराज्याभिषेक दिन होत असल्याने या सोहळ्याला मान्यवरांनी उपस्थिती लावली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात जुना राजवाडा येथे शिवराज्याभिषेक दिन संपन्न झाला.
शिवप्रेमींची रायगडावर तुफान गर्दी: शिवरायांच्या 350 वा दिमाखदार सोहळ्याचा आज शेवटचा दिवस आहे. शिवप्रेमींनी गडावर तुफान गर्दी केली आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आवाहन केले आहे. रायगडावर क्षमतेपेक्षा शिवप्रेमी जमले आहेत. दुसरीकडे महाड ते रायगड वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी रायगडावर जाण्याचा मार्ग बंद केला आहे. दुर्गराज रायगडवर सध्या जवळपास अडीच लाख लोक उपस्थित आहेत. रायगडाच्या खाली जवळपास ५० - ७५ हजार लोक आलेले आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.
हेही वाचा: