कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील महापूर ओसरल्यानंतर अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पीक, चारा कुजल्याने जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे एकवेळ आमची जनावरे पुरात वाहून गेली असती तर चालले असते, पण त्यांची उपासमार पाहू शकत नाही. आमच्यावर राहूदे पण आमच्या जनावारांवर तर दया दाखवा, अशी आर्त हाक राज्य सरकारला शेतकऱ्यांनी दिली आहे.
उपासमारीची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती नदी शेजारील पिके पाण्याखाली गेल्याने कुजली आहेत. तर यंदाच्या महापुराची भीषणता सर्वात जास्त शिरोळ तालुक्याला जाणवत आहे. कारण कृष्णा नदीच्या काठावर शिरोळ तालुका असल्याने जवळपास 42 गावे पूर्णतः पाण्याखाली गेली होती. तर परिसरातील हजारो हेक्टर शेती, पिके, चारा पाण्याखाली गेला. त्यामुळे जनावरांना मिळणारा चारा न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच जनावारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गायी, म्हैस आठण्याचा प्रकार
शिरोळ तालुक्यातील जनावरांना वेळेत चार, खाद्य मिळत नसल्याने त्याचा परिणाम देणाऱ्या दुधावर होत आहे. त्यामुळे गायी व म्हैस यांच्यावर त्याचा थेट परिणाम झाल्याने दरवेळी १० ते १२ लिटर येणारे दूध सध्या ७ ते ६ लिटरवर येत आहेत. सानुग्रह अनुदान मिळाले नसल्याने त्यांचे खाद्यदेखील खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, अशी अवस्था शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्याची बनली आहे.
गॅस्ट्रो, डायरियाचा त्रास
महापुरामुळे चारा नसल्याने रान वैरण जनावरांना घातली जात आहे. मात्र या वैरणीमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यांना गॅस्ट्रो, डायरियाचा त्रास जाणवत आहे. अनेक जनावरांना अशक्तपणाची लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे संघाकडून मिळणारे खाद्य आणि मुबलक प्रमाणात चारा वेळेवर मिळणे आवश्यक आहे, असे मत पशुवैद्यकीय डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
ऊसावर फिरवला कोयता
शिरूर तालुक्यातील 42 गाव ही पूर्णत: पाण्याखाली गेल्याने त्या गावात असणाऱ्या जनावरांना चारा मिळणे कठीण झाले आहे. पिके कुजली गेल्याने जनावरांना चारा कुठून आणायचा, असा सवाल शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र तालुक्यातील अनेक गावांमधील जनावरांच्या प्रेमापोटी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या ऊसावर कोयता मारत जनावरांना चारा उपलब्ध करून दिला आहे.
'राज्य सरकारला नाही गांभीर्य'
महापूर ओसरल्यानंतर अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. याची कल्पना राज्य सरकारलादेखील आहे. मात्र महापूर ओसरल्यानंतर ज्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्या संकटाकडे राज्य सरकार मात्र गांभीर्याने पाहत नाही. महापूरातून पशुधन वाचवले, जवळपास दोन हजारपेक्षा जास्त जनावरांना सुरक्षितस्थळी स्थलांतरदेखील केले. पण महापूर ओसरल्यानंतर त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. याची जाणीव राज्य सरकारला असूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. राज्य सरकारने तत्काळ पशुखाद्य आणि चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केली आहे.