कोल्हापूर - शर्मिला ठाकरे सध्या कोल्हापूर-सांगली दौऱ्यावर आहेत. त्यांनी नुकतीच कोल्हापुरातील मुस्लीम बोर्डिंग याठिकाणी पूरग्रस्तांची भेट घेतली. यावेळी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना, पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी वेळीच बोटी आल्या असत्या तर अजून चांगले झाले असते, अशा शब्दात त्यांनी आपले भाव व्यक्त केले.
शर्मिला ठाकरेंनी नुकतेच कोल्हापुरातील मुस्लीम बोर्डिंग याठिकाणी भेट देऊन पूरग्रस्तांची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी निसर्गाचे संकट खूप मोठे होते, त्यामुळे बोटी वेळेवर आल्या असत्या तर अजून चांगले झाले असते, असे त्या म्हणाल्या.
ही वेळ आरोप-प्रत्यारोप करण्याची नाही. जेवढी मदत करता येईल तेवढी मदत शासनाने करावी. याठिकाणी कितीही कर्तव्यदक्ष अधिकारी असले तरी पुराचे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात होते कि, त्या ठिकाणी खूप मोठे संकट लोकांवर आले आहे. सध्या महिलांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहे. त्या दृष्टीने मनसेकडून मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची टीम तसेच ५०० ते ६०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची टीम मुंबईहून गुरुवारी रात्रीपर्यंत दाखल होत आहे. अनेक लोकांच्या घरांमध्ये चिखलाचे मोठ-मोठे थर साचले आहेत. त्यांना आता स्वच्छतेची मोठ्या प्रमाणात मदत लागणार आहे. त्यासाठी आमच्याकडून जे शक्य आहे ते आम्ही करत आहोत, असे त्या म्हणाल्या.