कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे. त्यांच्या आजोळच्या मंडळींनीसुद्धा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. प्रत्यक्षात शरद पवार यांना भेटू शकत नसले, तरी त्यांच्याबद्दल असलेले प्रेम गावकऱ्यांनी वाढदिवस साजरा करून व्यक्त केले आहे.
पवारांची गोलीवडे भेट
कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे हे शरद पवार यांचे आजोळ आहे. आज सकाळपासूनच गावकऱ्यांनी वाढदिवस साजरा करायचे ठरवले होते, त्यानुसार केक कापून त्यांचा वाढदिवस आजोळच्या मंडळींनी साजरा केला. दोन वर्षांपूर्वी शरद पवार स्वतः गोलीवडे गावात आले होते. शिवाय आपल्या आजोळच्या मंडळींना भेटले होते. आज शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावकऱ्यांनी वाढदिवस साजरा करत त्यांना दीर्घायुष्य लाभू देत, अशा शुभेच्छाही दिल्या.
सुसज्ज शाळा आणि सांस्कृतिक हॉलसाठी दिले 2 कोटी
शरद पवार यांनी दोन वर्षांपूर्वी गोलीवडे गावात येऊन गावकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर गावातील विकासाबाबत संपूर्ण पार्श्वभूमीसुद्धा जाणून घेतली होती. त्यानंतर त्यांनी गावात सुसज्ज शाळा आणि सांस्कृतिक हॉलसाठी जवळपास 2 कोटी रुपये आपल्या फंडातून दिले होते. सध्या त्याचे काम सुरू असून ते सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. बांधकाम सुरू असलेल्या त्याच शाळेसमोर आज गावकऱ्यांनी शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला.
'साहेब पुन्हा गावाला भेट द्या'
देशातील राजकारणात शरद पवार यांचे मोठे नाव आहे तरीही ते आपल्या मामाचं गाव विसरले नाहीत. आजोळी भेट देऊन मी पुन्हा येऊन जाईन, असे गावकऱ्यांना आश्वस्त केले होते. त्यानुसार आज गावकऱ्यांनी त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करून मामाच्या गावाला पुन्हा भेट द्या, असे निमंत्रणसुद्धा दिले.