कोल्हापूर - संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शाहूवाडी तालुक्यातील वारणा कापशी येथील आरव राकेश केसरे (वय 6 वर्षे ) याच्या खुनाचा पोलिसांनी अवघ्या 48 तासांत छडा लावला आहे. 6 वर्षांच्या आरवचा त्याच्याच वडिलांनी खून केल्याचे समोर आले आहे. स्वतः आरवचे वडील राकेश सर्जेराव केसरे (वय 27 वर्षे ) याने खुन केल्याची कबुली दिली असल्याची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली. या प्रकरणी आरोपी विरोधात शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बापानेच केली मुलाची हत्या; पोलिसांसमोर कबुली स्वतः वडिलांची पोलिसांसमोर कबुली - मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या दरम्यान, संशयित आरोपी राकेश केसरे आणि त्याची पत्नी यांच्यात भांडण झाले होते. त्या भांडणातून राग आल्याने त्याने आरवला मारले. यात आरव जागीच बेशुद्ध पडला. भीतीपोटी त्याने त्याचा गळा दाबून खून केला. शिवाय त्याचा मृतदेह गडबडीने घराजवळील पडक्या खोलीत ठेवला. स्वतः वडील राकेश केसरे याने याबाबत पोलिसांसमोर कबुली दिली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात नरबळीमुळे ही गंभीर घटना घडल्याबाबत बोलले जात होते, मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. स्वतः शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी हा कोणताही नरबळी चा प्रकार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
48 तासांत गुन्ह्याचा छडा; पोलिसांचे सर्वत्र कौतुक -
दरम्यान, अंगावर गुलाल, हळदी-कुंकू टाकलेल्या अवस्थेत चिमुकल्या आरवचा मृतदेह सापडला होता. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार तर नाही ना, असा सर्वांना संशय होता. मात्र पहिल्यापासूनच पोलिसांनी याबाबत संशय व्यक्त करत यामध्ये कोणीतरी नातेवाईकच असणार असल्याबाबत म्हंटले होते. त्यानुसार तपास सुरू ठेवला, शेवटी अनेकांची चौकशी आणि तशा पद्धतीने तपास केल्यानंतर हा नरबळीचा प्रकार नसून आई वडिलांच्या भांडणातून चिमुकल्याचा बळी गेल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलीस खात्याने या गुन्ह्याचा तपास अवघ्या 48 तासात लावल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि कर्मचारी करीत आहेत.
3 ऑक्टोबर रोजी आरव झाला होता बेपत्ता -
सहा वर्षीय आरव राकेश केसरे हा त्याच्या राहत्या घरातून तीन ऑक्टोबर रोजी गायब झाला असल्याबाबत त्याच्या वडिलांनीच पोलीस ठाण्यात नोंद केली होती. त्यानंतर त्याला घरच्या इतर व्यक्तींनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला. शोध मोहिमेत वडील सुद्धा पुढेच होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आरवला शोधण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र त्याला कोणी पाहिल्याचे काहीही समजले नाही. शेवटी परवा मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी आरवचा मृतदेह त्याच्या घरापासून केवळ 100 मीटर अंतरावर एका जागेवर आढळला. त्याच्या अंगावर गुलाल हळदी कुंकू लावलेले होते. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार आहे का? असा संशय सर्वांनी व्यक्त केला होता. शेवटी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला अटक केली आहे. शिवाय त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा तसेच पुरावे नष्ट करण्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतः शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी याबाबत माहिती दिली.हेही वाचा - आरवची हत्या नरबळी प्रकारातून नाही.. हत्येमागे जवळचा नातेवाईक असल्याचा पोलिसांना संशय
हेही वाचा - गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक