कोल्हापूर - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संभाजीराजेंचे वडील शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली आहे. यावेळी 10 ते 15 मिनिटे शाहू महाराज व संजय राऊत यांच्यात चर्चा झाली. संभाजीराजेंना राज्यसभेची उमेद्वारी नाकारल्यानंतर ही भेट महत्त्वाची मानल्या जात आहे. दरम्यान काल शाहू छत्रपती महाराज यांनी मोठं वक्तव्य केलं होत. राज्यसभेसाठी गणित जुळवून न आणता पक्ष घोषित करणे हा संभाजीराजेंचा निर्णय चुकला. ज्यांच्याकडे मतं जास्त आहेत त्यांच्याकडे ते अप्रोच झाले नाहीत, असे भाष्य संभाजीराजे यांचे वडील श्रीमंत शाहू छत्रपती महाराज ( Shrimant Shahu Chhatrapati Maharaj) यांनी केले होते. त्याचं पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून भेट घेतली - या भेटीनंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. मी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. उद्धव ठाकरेंनी सकाळी मला फोन करुन कोल्हापुरात आहात तर महाराजांचे आशीर्वाद घ्या आणि मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे, असं सांगितले होते त्यानुसार मी आज त्यांचे आशीर्वाद घेतले. ठाकरे कुटुंब आणि महाराजांचं एक नाते आहे. उद्धव ठाकरेंनी महाराजांना फोनवर मी स्वत: कोल्हापुरात येईन, असं सांगितले असल्याचे संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले होते शाहू महाराज - काल शाहू छत्रपती महाराज राज्यसभेच्या जागेसाठी झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली होती.छत्रपती घराण्याचा अपमान याचा प्रश्न येत नाही, हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत आले असते तर विषय वेगळा असता पण तसे काही झाले नाही. उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली. आमच्यात काही विचार विनमय झाला असता किंवा मी सहमती दिली असती, नसती पण तसे काही झाले नाही. छत्रपती घराण्याचा निर्णय वैगेरे वेळोवेळी सांगत आले पण त्यांचे निर्णय हे सगळे व्यक्तिगत होते.
हेही वाचा - Sanjay Raut criticize BJP : संभाजी राजेंना पुढे करून राजकारण करणाऱ्यांचे प्रयत्न फसले - संजय राऊत