कोल्हापूर - गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज (बुधवार) कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. कोल्हापूरात नाविन्यपूर्ण योजना राबवल्यामुळे कोरोनाचा अधिक संसर्ग झाला नाही. पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळाल्याने संसर्ग रोखण्यास मदत झाली, असे म्हणत शंभूराज देसाई यांनी यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कौतुक केले.
मागील काळात गोव्यातून येणाऱ्या अवैध मद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन काळात ज्यांनी चोरून मद्य विक्री केली, अशा 8 दुकानांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत. तर, 40 दुकानांवर कारवाई केली असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले. आढावा बैठकीनंतर कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
कोरोना संकट काळात राज्य सरकार जो निर्णय घेईल, त्याला सहकार्य करण्याची भूमिका मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतली आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळांनी राज्य सरकारला सहकार्य करावे,असे आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
हेही वाचा - राज्य सरकारचा 'मराठी बाणा' ...मराठीत कामकाज केले नाही तर शासकीय अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे शरद पवारांबद्दलच्या वक्तव्याबाबत मंत्री देसाई यांना विचारले असता त्यांनी, पडळकर यांना महत्व देण्याची आवश्यकता नाही. तसेच त्यांची ऑडिओ-व्हिडीओ क्लिप घेण्याचे काम सुरू आहेत. त्यांच्यावर दोन ठिकाणी गुन्हे देखील दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्री उशिरापर्यंत मद्य विक्री करणारी दुकाने सुरू असतात. याबाबत देसाई यांनी विचारले असता त्यांनी, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल आणि रात्री उशिरापर्यंत दारू दुकाने सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देणार असल्याचे सांगितले.
ई-पास काढणाऱ्या एजंटांवर गुन्हे दाखल केले जात आहे. जे एजंट आणि अधिकारी ई-पास काढताना पैसे घेताना आढळतील त्यांच्यावर करावाई करण्याचा इशारा मंत्री देसाई यांनी यावेळी दिला. राज्यातील रिक्त असलेली गृहखात्यातील पदे भरण्याची प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबवली आहे. कोरोनाचे संकट कमी झाल्यावर भरती प्रक्रिया राबवू, असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषेदेला जिल्हाधिकारी दौलत देसाई, खासदार धैर्यशील माने, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, आमदार प्रकाश अबीटकर यांची उपस्थिती होती.