कोल्हापूर - राज्य सरकारने शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्थेची सुरुवात केली. मात्र, या संस्थेचा कारभार आणि त्याला मिळणारा निधी यावरून गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. याप्रकरणी एमपीएससी, युपीएससीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप त्यांचे विद्यावेतन न मिळाल्याने काही विद्यार्थी दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषणाला बसले आहेत. तर, या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरातही मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात उपोषण करत याबाबत लक्ष वेधन्याचे प्रयत्न केले. त्यावेळी सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या मंत्री एकनाथ शिंदे यांनी संस्थेबाबतच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. परिणामी गेल्या ३ महिन्यांपासून एमपीएससी, युपीएससीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही. हे वेतन मिळावे म्हणून काही विद्यार्थी दिल्लीतील जंतरमंतरवर उपोषणाला बसले आहेत.
या विध्यार्थ्यांना पाठिंबा देत कोल्हापूरातही मराठा समाजाच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सारथीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. दरम्यान शासनाला ही संस्था बंद पाडायची आहे की काय असा संशय येत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
हेही वाचा - ईटीव्ही भारत Exclusive : कोल्हापुरात चक्क 'टॉयलेट'सोबत व्हॅलेंटाईन डे साजरा!
हेही वाचा - पन्हाळ्याजवळ गव्यांच्या कळपाचे दर्शन