कोल्हापूर - जिल्ह्यातील पेठवडगावमध्ये असलेल्या ‘डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल’मधील रोनित नायक हा विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एनडीए परीक्षेत, सर्वाधिक गुण मिळवून देशात पहिला आला आहे. त्याच्याच शाळेतील आणखी 4 विद्यार्थ्यांनी सुद्धा या परीक्षेत यश मिळवले आहे. अंगी जिद्द, चिकाटी, तीव्र ईच्छाशक्ती, मनाची एकाग्रता, अभ्यासात सातत्य असेल तर परीक्षा कोणतेही असो यश हमखास मिळते याचे उदाहरण या विद्यार्थ्यांनी घालून दिले आहे.
रोनितसोबत आणखी चौघांनी मिळवले यश -
कॅडेट रोनित रंजन नायक हा विद्यार्थी, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या एनडीए परीक्षेमध्ये (१४५ वी तुकडी) सर्वाधिक 1003 इतके गुण मिळवून देशात पहिला आला आहे. याशिवाय त्याच्या शाळेतील कॅडेट पंकेश महाले (देशात १२), कॅडेट गौरव मोहन नाथ (देशात ८९ वा), कॅडेट चंदन पुंडलिक हरेल (देशात ११५ वा), कॅडेट पवन सोमेश्वर निर्मल (देशात १७५ वा) या विद्यार्थ्यांनी सुद्धा एनडीए परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पोळ यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
रोनितचे वडीलसुद्धा नौदल अधिकारी -
देशात अव्वल क्रमांक पटकावलेला रोनित नायक हा मूळचा ओडिशा येथील आहे. रोनितचे वडील नौदल अधिकारी आहेत. दहावीनंतर सायरस पूनावाला शाळेमध्ये एनडीए परीक्षेची तयारी करण्यासाठी रोनितने प्रवेश घेतला. सीबीएसई अभ्यासक्रमातून बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. सैन्यदलात अधिकारी व्हायचे हे ध्येय ठेवून त्याने एनडीएची तयारी केली. रोज आठ तास अभ्यास, विविध प्रकारचे खेळ या माध्यमातून त्याने तयारी केली. त्यामुळे त्याला घवघवीत यश मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले. रोनित आणि इतर विद्यार्थ्यांना संस्था अध्यक्ष गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, संस्थेच्या सचिव व स्कूलच्या अध्यक्षा विद्या पोळ यांची प्रेरणा मिळाली. स्कूलचे संचालक डॉ. सरदार जाधव, प्राचार्य मारुती कामत, एएफपीआयचे चेअरमन विश्वास कदम, एएफपीआयचे संचालक मेजर चंद्रसेन कुलथे व पालकांचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा - शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार सक्रिय; सुप्रिया सुळेंनी व्हिडिओ केला शेअर