कोल्हापूर - कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पण तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला विरोध केला होता. कर्नाटक प्रशासनानेसुद्धा त्यांचीच बाजू घेत रातोरात हा अश्वारूढ पुतळा हटवला.
![removed of Shivaji maharaj statue in Mangutti village in belgaum](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-kop-02-belgaon-shivaji-maharaj-statue-issue-2020-7204450_08082020152956_0808f_1596880796_506.jpg)
मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या ठरावानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, काल अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलनं करण्यात येत असून, सोमवारपर्यंत महाराजांचा पुतळा पुन्हा बसवला नाही, तर मनगुत्तीमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा सीमा भागातील मराठी बांधवांनी दिला. गावकऱ्यांनी यासंदर्भात जाब विचारण्यासाठी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता त्याठिकाणी गर्दी केली आहे.