कोल्हापूर- शहर व जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतली. काल दिवसभर पावसाचा जोर कमी असल्याने पंचगंगेच्या नदीची पातळी स्थिर राहिली. मात्र 12 ऑगस्ट पासून पुढील चार दिवस कोल्हापुरात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महापूराची गंभीर स्थिती रोखण्यासाठी धरणातील पाणी सोडून जागा करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
गेल्या वर्षी आलेल्या महापुराचे संकट यंदा टाळण्यासाठी वेळोवेळी धरणातील पाणीसाठा रिकामा करण्यात आला. त्यामुळेच यंदा बिकट परिस्थिती निर्माण झाली नाही. अन्यथा यावर्षीदेखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती. दरम्यान, 12 ऑगस्ट पासून जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिल्याने यापुढे धरणातील पाणीसाठा त्याचे योग्य नियोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
यंदा जून महिन्यापासूनच पाटबंधारे विभागाची बैठक घेऊन धरणांमधील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, पाणी उपसा करावा, अशा सूचना प्रशासनाकडून दिल्यामुळे यंदा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत धरणातील पाणीसाठा 50 ते 60 टक्क्यांपर्यंत होता.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. पाण्याचे योग्य नियोजन झाल्यामुळे धरणाचे कृत्रिम दरवाजे उघडण्याची वेळ आलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.