कोल्हापूर - रविवारी सकाळपासून आणखी 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आणखी 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापुरात सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण बरे होतानाचे चित्र पाहायला मिळत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. एकीकडे दिलासादायक चित्र असले तरी दुसरीकडे दोन दिवसानंतर मोठ्या संख्येने रुग्णांची संख्या वाढली आहे.
रविवारी वाढलेल्या 15 रुग्णांमुळे आत्तापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 680 वर गेली आहे तर त्यातील एकूण 449 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 8 जणांचा कोल्हापुरात कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अद्याप 223 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरात आणखी एक रुग्ण वाढल्याने रंकाळा टॉवर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर शाहूवाडी तालुक्यात सुद्धा 4 दिवसांनंतर आणखी 5 रुग्णांची वाढ झाली आहे. शाहुवाडीत सर्वाधिक 174 रुग्णांची नोंद झाली आहे. डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा सर्वाधिक रुग्ण शाहूवाडी तालुक्यातील आहेत.
तालुका, नगरपालिका आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
आजरा- 72
भुदरगड- 67
चंदगड- 72
गडहिंग्लज- 77
गगनबावडा- 6
हातकणंगले- 7
कागल- 55
करवीर- 14
पन्हाळा- 25
राधानगरी- 63
शाहूवाडी- 174
शिरोळ- 7
नगरपरिषद क्षेत्र- 11
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-22
असे एकूण 672 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2, आंध्रप्रदेश-1 आणि मुंबई-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 680 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 680 रूग्णांपैकी 449 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यात अद्याप 223 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.