कोल्हापूर - विरोधकांनी कितीही आटापिटा केला, तरी नरेंद्र मोदींचेच सरकार येणार. राज्यात भाजप-सेना एकत्र आले पण माझे नाव आठवले असतानाही ते मला विसरले, असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कोल्हापूरात केले. आठवले सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, की भ्रष्टाचाराचा एकही आरोप नरेंद्र मोदींवर नाही. मोदी हे फकीर माणूस आहेत. तर तरुणाईचा मोदींना पाठिंबा असल्यामुळे ते पुन्हा नक्कीच पंतप्रधान होतील. आर्थिकदृष्टया मागास लोकांना आरक्षण द्या, ही मागणी सर्वात अगोदर मी केली होती. त्याप्रमाणे मोदींनी आर्थिकदृष्टया मागास लोकांना आरक्षण दिले. शिवसेनेने मुंबईची एक जागा मला सोडायला हवी होती, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच उद्धव ठाकरे यांनी मोठे मन दाखवून मला जागा सोडावी, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र यावी, असे बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्यामुळे बाळासाहेबांचे स्वप्न साकार करायचे असेल तर आमच्या पक्षाला जागा देण्याचा विचार करावा. सोलापूरमधून लढण्याचा प्रकाश अंबेडकरांचा निर्णय योग्य नाही. त्यांना तिथे मते पडणार नाहीत. वंचित आघाडी ही महाराष्ट्राला पर्याय देणारी आघाडी नाही. वंचित आघाडी जेवढी मते खाईल, त्याचा फायदा शिवसेना आणि भाजपला फायदा, असेही ते यावेळी म्हणाले.
शरद पवार हे चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांनी अभ्यास करून माढ्यातून न लढण्याचा निर्णय घेतला आहे. पवारांचा निर्णय योग्य आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. मला काँग्रेस - राष्ट्रवादीकडून ऑफर आली होती, परंतु आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत रहाणार मोदींनी कामे केलीत त्यामुळे कायम त्यांच्या सोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हवा कुठे वाहते त्या बाजूने मी जातो. सध्या काँग्रेसची हवा नाही, राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकत नाहीत. त्यांनी विरोधी पक्ष नेते व्हाव, असेही ते यावेळी म्हणाले.