कोल्हापूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये आज शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सरकारने शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावर बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारचे सात बारा कोरा करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले नाही, असे मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा- गुगलमध्ये सुंदर पिचाईंचे 'नवे युग'; दुप्पट वेतनासह कोट्यवधी रुपयांचे मिळणार शेअर
कर्जमाफीची आज जी घोषणा करण्यात आली, त्यात केवळ ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्याच थकबाकीदारांचे कर्ज माफ होणार आहे. महापूर, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांचे यावर्षीच्या महापुरात आणि दुष्काळात पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांसाठी कर्ज काढले आहे. त्यामुळे ज्यांचे या महापुराने आणि दुष्काळाने नुकसान झाले आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या कर्जमाफीमुळे सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली म्हणता येणार नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याबाबत काहीच निर्णय नाही, अशीही टीका राजू शेट्टींनी केली.