कोल्हापूर - टाळेबंदीच्या काळातील घरगुती वीज बिल माफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. गेल्या 3 महिन्यांपासून वाढीव विजबिलाबाबत सातत्याने प्रश्न मांडत आहे. मात्र, याची अद्याप दखल घेऊन निर्णय घेतला नसल्याचा निषेधार्थ राज्यभरातील महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येणार आहे, अशी माहीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी माहिती दिली.
येणाऱ्या मंगळवारी (27 ऑक्टोबर) हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी खासदार शेट्टी यांनी म्हटले आहे. टाळेबंदीच्या काळात अनेकांचे व्यवसाय बुडाले, नोकऱ्या गेल्या, काहींवर उपासमारीची वेळ आली आणि अशातच भर म्हणून महावितरणची भरमसाठ विजबिले नागरिकांना आली आहेत. याबाबत गेल्या 3 महिन्यांपासून सातत्याने अनेक आंदोलन केली, बिलांची होळी केली, जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढले, मुख्यमंत्र्यांसह ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी याबाबत निवेदने दिली.
घरगुती वीज विले माफ करण्याबाबत निर्णय घेऊ, असे सांगण्यात सुद्धा आले होते. मात्र, आद्यपही याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे सर्वांनीच रस्त्यावर उतरून महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याची गरज असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील महावितरणच्या प्रमुख कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून टाळे ठोकण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
हेही वाचा - नवरात्रौत्सव : अष्टमीदिवशी अंबाबाईची महिषासूरमर्दिनी स्वरुपात पूजा