कोल्हापूर - कोरोनाने कोल्हापुरात अक्षरशः कहर केला आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल 2 हजार 300 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 58 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानादेखील नागरिकांमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दी केल्याचा प्रकार कोल्हापुरात समोर आला आहे. वारणा दूध डेअरीच्या सभासदांना मोफत श्रीखंड वाटप केले जात आहे. त्यासाठी सभासद नागरिकांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या श्रीखंड वाटपासाठी वारणा दूध संघाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचेही समोर आले आहे.
दाभोळकर कॉर्नर परिसरातील केंद्राबाहेर गर्दी -
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत चालले आहेत. महिनाभरातील मृतांची संख्या सुद्धा 800 पार गेली आहे. असे असताना वारणा दूध संघाच्या सभासदांसाठी मोफत श्रीखंड वाटप सुरू केले होते. विशेष म्हणजे कोणतीही परवानगी घेतली नसताना रांगा लावून सभासदांनी श्रीखंडासाठी गर्दी केली होती. पोलीस तसेच पत्रकार पोहोचताच, आम्ही वाटप बंद केले असल्याचे सांगत दूधसंघाच्या कर्मचाऱ्यांनी गर्दीला पांगावण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी सुद्धा जीवापेक्षा श्रीखंड महत्वाचे आहे का? असा सवाल करत गर्दी केलेल्या सभासदांना घरी जाण्याचे आवाहन केले.
हेही वाचा - तामिळनाडूच्या केमिकल फॅक्टरीमध्ये स्फोट; चार ठार, कित्येक जखमी