कोल्हापूर - कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात पहिल्या दिवसापासून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीला सुरुवात केलीय. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण जारी केली आहे. त्यानुसार शाहू कारखान्यात ब्राझील पॅटर्नप्रमाणे थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती सध्या जोरात सुरू आहे. पाहुयात यावरचा 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट.
इथेनॉल म्हणजे नेमकं काय ?
पूर्वी साखर कारखान्यात मळीपासून इथेनॉलची निर्मिती केली जायची. ते सुद्धा अगदी मोजक्या कारखान्यांमध्ये याचे प्रकल्प आहेत. पण सध्या केंद्र सरकारने सुद्धा कारखानदारांना इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन दिल्याने, आता थेट उसाच्या रसापासून इथेनॉल बनवायला काही कारखान्यांनी सुरुवात केली आहे. कोल्हापुरातील श्री शाहू कारखाना सुद्धा त्यापैकीच एक आहे. पण आपल्या ऊसापासून कारखानदार इथेनॉल बनवतात ते इथेनॉल म्हणजे नेमकं काय? असा अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो. ईथेनॉल एक मोनोहाइड्रिक अल्कोहोल आहे. विशिष्ट गंध आणि चवीसह तो अस्थिर, रंगहीन तसेच ज्वालाग्राही द्रव आहे. इथेनॉलचा वापर प्रामुख्याने इंधन, उद्योग क्षेत्रात, औषध आदी अनेक गोष्टींमध्ये आढळतो.
या प्रकल्पाविषयी काही ठळक वैशिष्ट्ये
1) उसाच्या रसापासून तयार झालेल्या इथेनॉलला तब्बल 62.65 रुपये प्रतिलिटर इतका दर आहे
2) इथेनॉल पुरवठा झाल्यानंतर फक्त 21 दिवसात कारखान्यांना बिलाचे पैसे मिळतात. त्यामुळे कारखाना आर्थिक संकटात सापडत नाही.
3) थेट रसापासून इथेनॉल निर्मिती केल्यामुळे साखर निर्मिती कमी होते. सरासरी साखर उतारा कमी राहतो. एफआरपी अदा करण्यासाठी निर्माण झालेली साखर अधिक इथेनॉल निर्मितीकडे गेलेली साखर असा एकूण साखर उतारा गृहीत धरला जातो.
4) पेट्रोलियम पदार्थ आयातीसाठी खर्च होणारे देशाचे परकीय चलन वाचते
5) इथेनॉलला पर्यावरणपूरक इंधन म्हणून मान्यता आहे. कारखान्यांनी अशी इथेनॉल निर्मिती केल्यास आर्थिक लाभ तर होईलच, त्याचबरोबर देशात निर्माण झालेले वाढत्या साखर साठ्याचे संकट देखील कमी होईल.
श्री छत्रपती शाहू कारखान्यात दररोज 60 हजार लिटर इथेनॉल निर्मिती
श्री शाहू सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात पहिल्या दिवसापासून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती सुरू केली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन धोरण जाहीर केल्यानंतर गळीत हंगाम 20-21 मध्ये दररोज एक हजार मेट्रिक टन उसाचं गाळप वाढवलं असून, त्यातून दररोज 60 हजार लिटर इथेनॉल निर्मिती होत आहे. दररोज होणाऱ्या गाळपापैकी रसाचा काही भाग साखर निर्मितीसाठी आणि काही भाग इथेनॉल निर्मितीसाठी वापरण्याचे नियोजन आहे.
विक्रमसिंह घाटगे यांनी 2002 साली केला होता ब्राझीलचा दौरा
सध्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यात इथेनॉल निर्मितीला सुरुवात जरी झाली असली तरी, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे आणि कार्यकारी संचालक विजय औताडे यांनी 18 वर्षांपूर्वी 2002 साली ब्राझीलचा दौरा केला होता. ब्राझीलला साखर कारखानदारीचा बादशाहा म्हणलं जातं. त्यानंतर इथेनॉल निर्मितीला हळूहळू प्रारंभ झाला. सध्या शाहू कारखान्यात इथेनॉलचा ब्राझील पॅटर्न पूर्ण क्षमतेने राबवण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना वेळेत पैसे मिळतात
पूर्वी साखर कारखाने केवळ साखर उत्पादनापूरते मर्यादित होते. हळू हळू यामध्ये कारखाने बायप्रॉडक्ट्स सुद्धा घेऊ लागले आहेत. मात्र अजूनही काही कारखाने बायप्रॉडक्ट्सकडे वळले नाहीयेत. शिवाय साखरेला मागणी नसल्याने साखर विक्री करायची कशी ही चिंता अनेक साखर कारखान्यांसमोर वारंवार असते. साखर विक्री होत नसल्याने शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी देणे शक्य होत नाही, अशी अनेक कारणेही कारखानदार सांगतात. मात्र उसाच्या रसापासून तयार झालेल्या इथेनॉलला प्रति लिटर 62 ते 65 रुपये दर मिळतो. तसेच इथेनॉल पुरवठा झाल्यानंतर 21 दिवसात बिलही कारखान्याला मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पैसे देने शक्य झाले आहे. यातून शेतकरी व कारखानदार या दोघांचाही फायदा होत आहे. त्यामुळे आता श्री छत्रपती शाहू सहकारी कारखान्यात उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीचा सुरू असणारा ब्राझील पॅटर्न इतर कारखान्यासाठी सुद्धा प्रेरणादायी ठरत आहे.