कोल्हापूर : आषाढी एकादशीला अवघे काही तास बाकी आहेत. लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला वैष्णवांचा मेळावा रवाना झाला आहे. वारकऱ्यांना देखील पंढरीच्या विठु-माऊलीच्या दर्शनाची आस लागली असून आषाढीनिमित्ताने राज्यभरातील अनेक मंदिरे गजबजली आहेत. कोल्हापुरातील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेले करवीर तालुक्यातील नंदवाळ मंदिर देखील आषाढीसाठी सज्ज झाले आहे.
हेमाडपंथी दगडी मंदिर : करवीर काशी ग्रंथात विठ्ठलाच्या वास्तव्याने पावन झालेल्या नंदापुरी म्हणजेच करवीर तालुक्यातील नंदवाळचा उल्लेख आढळतो. या ठिकाणी असणाऱ्या हेमांडपंथी दगडी मंदिरात विठ्ठल वास्तव्यास असतात, अशी आख्यायिका सांगितली जाते. नंदवाळ या गावचा प्राचीन उल्लेख नंदिग्राम असा आहे. या ठिकाणी विठ्ठल मंदिर, शंकराचे पवित्र स्थान भिमाशंकर ही दोन्ही पवित्र धार्मिक स्थळे आहेत. अशा प्राचीन देवतेच्या उपासनेसाठी या ठिकाणी हेमाडपंती दगडी मंदिर आहे.
युगे 32 विटेवर उभा : करवीर काशी ग्रंथात विसाव्या खंडातील 17 क्रमांकाच्या पानावर प्रति पंढरपूर नंदिग्राम असा उल्लेख आढळतो. पंढरपूरला युगे अठ्ठावीस पांडुरंग विटेवर उभा आहे. मात्र, त्याआधीही चार युगे म्हणजेच 32 युगे असा उल्लेख नंदिग्रामचा आढळतो. त्यामुळेच प्रति पंढरपूर असलेल्या नंदवाळला आधी नंदापुरी मग पंढरपूरी असे संबोधले जाते. नंदवाळमध्ये आषाढी यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री पांडुरंग वास्तव्यास असतात. ते वारीच्या दिवशी सकाळी पंढरपूरला रवाना होतात अशी आख्यायिका आहे. यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा गोवा राज्यातून लाखो भाविक नंदवाळमध्ये दाखल होतात. टाळ मृदंगाच्या गजरात कोल्हापुर पासून बारा किलोमीटर असलेला परिसर गजबजून जातो.
आषाढी दिवशीनगर प्रदर्शना आणि रिंगण सोहळा : मुख्य आषाढी एकादशीच्या सकाळी मिरजकर तिकटी येथून पालखी निघते. करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिराला नगर प्रदर्शना करून ही पालखी नंदवाळकडे रवाना होते. अखंड 12 किलोमीटरच्या या मार्गावर भाविक फुलांच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत करतात. शहरातील खंडोबा तालमीजवळ उभा रिंगण सोहळा तर, पूईखडी येथे गोल रिंगण सोहळा पार पडतो, यानंतर पालखी नंदवाकडे रवाना होते.
पोलीस बंदोबस्त तैनात : प्रतिपंढरपूर नांदवळ येथे राज्य व देशातून भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालखी मार्ग आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. तसेच मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - Ashadhi Wari 2023 : विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी, मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणारे शासकीय महापूजा