कोल्हापूर - ईव्हीएम हॅकची सुद्धा एक आर्थिक बाजारपेठ आहे. विरोधी पक्ष नसेल तर त्यांचा बाजार कोलमडणार आहे. त्यामुळे हॅक इंडस्ट्री स्वतः विधानसभा निवडणुकीत हॅकच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे यंदा ईव्हीएममध्ये हॅकिंग होणार नाही. त्यामुळे आम्ही सत्तेवर येणारच, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन यात्रेची सांगता सभा आज कोल्हापूरात होत आहे. या निमित्तानं कोल्हापूरात प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा कोल्हापुरात 'रोड शो'; राष्ट्रवादीची यात्रा मार्गात 'बॅनरबाजी'
धर्मनिरपेक्ष मतांची वंचितमुळे विभागणी होत असल्याचा आरोप करणाऱ्यांनी आधी आपले दामन बघावे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.
शरद पवारांनी स्वतःचे दामन तपासून पाहावे. बेदाग असेल तरच टीका करण्याचा अधिकार असतो. लोकसभा निवडणुकीनंतर आमची 'झेप' मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळेच त्यांनी आम्ही विरोधी पक्ष असू म्हटले आहे. पण आमची झेप 'सत्ता संपादन झेप' सत्ता संपादन करण्यापर्यंत आहे. हे येणाऱ्या निवडणुकीत सिद्ध करून दाखवू, असा विश्वासही आंबडेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - शाहू नगरीत मुख्यमंत्री शाहूंनाच विसरले!
वंचित ही भाजपची बी टीम असल्याच्या आरोपावर विचारले असता, आंबेडकर म्हणाले, असे आरोप करणारे भाजपचे गुलाम आहेत, असा टोलाही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला. शिवाय जाता-जाता त्यांनी एमआयएमसाठी आमचे दरवाजे खुले असल्याचा पुनरुच्चारही केला.
हेही वाचा - कोल्हापुरात मुख्यमंत्री अन् महसूलमंत्र्यांच्या बॅनरवर फासले काळे