कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज 35 ते 45 रुग्णांचा मृत्यू होत आहे. 1 एप्रिलपासून आजपर्यंत तब्बल 700 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील पंचगंगा स्मशानभूमीवर मोठा ताण आला आहे. सद्या शेणी तसेच लाकडाचा पुरेसा साठा आहे. मात्र, अशाच पद्धतीने मृत्यूंची संख्या वाढत गेली, तर हा साठा सुद्धा कमी पडण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाळ्याचा विचार केल्यास आत्तापासूनच साठा करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेकडून शेणी आणि लाकूड खरेदी करण्यात आले असून नागरिकांनी सुद्धा यात पुढे येऊन शेणी दान करण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. पंचगंगा स्मशानभूमी येथे नेमकी काय परिस्थिती आहे, याबाबतचा आढावा 'ईटीव्ही भारत'ने घेतला.
दरवर्षी जवळपास 600 टन लाकूडाची गरज -
दरवर्षी कोल्हापूर शहरातील महत्त्वाची स्मशानभूमी असलेल्या पंचगंगा स्मशानभूमीत दरवर्षी जवळपास 600 टन लाकूड आणि 25 लाखांहून अधिक शेणीची गरज असते. महानगरपालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी याचा साठा करून ठेवत असते. मात्र, सद्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे हा साठा लवकरच संपण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
अंत्यसंस्काराला वाट बघावे लागत नाही -
देशातील अनेक ठिकाणी अंत्यविधीलासाठी 8 ते 10 तास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा जरी मोठ्या संख्येने रुग्णांचा मृत्यू होत असला तरी अंत्यविधीसाठी पंचगंगा स्मशानभूमी येथे कोणालाही वाट पाहावी लागत नाही. अतिशय चांगल्या आणि योग्य नियोजनामुळे नातेवाईकांना गैरसोयीचा सामना करावा लागत नाही. विशेष म्हणजे 6 तासांमध्ये नातेवाईकांनी रक्षाविसर्जन करून घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. जर नातेवाईक नाही आले तर रक्षा बाजूला करून त्याठिकाणी जागा रिकामी करून दिली जातो. त्यामुळे कोणालाही जास्त वेळ वाट पाहत बसावे लागत नाही.
गॅस शवदाहीनीवर सुद्धा ताण -
दररोज मोठ्या संख्येने मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस शवदाहीनीवर सुद्धा प्रचंड ताण आहे. येथील गॅस शवदाहीनीद्वारे दररोज 7 ते 8 मृतदेहांना दहन दिले जात आहे. त्यामुळे कोणत्याही नातेवाईकांना जास्त वेळ ताटकळत बसावे लागते नाही. शहरात आणखी काही स्मशानभूमी आहेत. मात्र, सद्या कोरोनाने मृत्यू झालेल्या सर्व मृतदेहांवर पंचगंगा स्मशानभूमी येथेच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे या एकूणच योग्य नियोजनामुळे आत्तापर्यंत सर्वकाही सुरळीत असल्याचे आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे यांनी म्हटले आहे.
शेणी आणि लाकूड दान करण्याचे आवाहन -
गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील सर्वच रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमी येथे महानगरपालिकेतर्फे अंत्यसंस्कार केले जात आहेत. गेल्या वर्षभरापासूनच या स्मशानभूमीवर मोठा ताण आहे. आता सुद्धा कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशाच पद्धतीचे वातावरण राहिले, तर लवकरच शेणी आणि लाकडाचासाठा संपण्याची शक्यता आहे. शिवाय पावसाळा सुद्धा सुरू होणार असून त्यापूर्वी साठा करून ठेवणे गरजेचे असल्याने कोल्हापूर महानगरपालिकेकडून शेणी आणि लाकूड दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी सुद्धा जिल्हाभरातून दानशूर व्यक्तींनी, मंडळांनी, तालमींनी स्मशानभूमी येथे शेणी आणि लाकूड दान करून मोठी मदत केली होती. अशीच यावर्षी सुद्धा करावी असे आवाहन करण्यात आले आहे.