कोल्हापूर - जिल्ह्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या राधानगरी तालुक्यातील 'राजापूर'मध्ये यंदा प्रथमच निवडणूक लागली आहे. कारण येथील निवडणूक बिनविरोध होत आली आहे. यंदा पहिल्यांदाच निवडणूक लागलेल्या या गावात मतदारांची संख्या कमी असल्याने सकाळी 11 वाजताच मतदान जवळपास पूर्ण झाले असल्याचे माजी सरपंच शिवाजी मांजरे यांनी म्हटले आहे. एवढ्या वेळेत एकूण 95 टक्के मतदान पूर्ण झाले असून काही मतदार मृत झाले आहेत. तर, परगावी असलेले 4 मतदार सुद्धा गावात येऊन मतदान करणार आहेत.
खरंतर आजपर्यंत गावात कधीही ग्रामपंचायत निवडणूक झाली नाहीये. ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने निवडणूक बिनविरोध होत आली आहे. मात्र पहिल्यांदाच 4 जागांसाठी गावात निवडणूक लागली आहे. सकाळपासून मतदारांनी मतदानकेंद्रावर गर्दी केली आणि केवळ साडेतीन तासांत गावातले मतदान पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले.
गावात आहे केवळ 'इतके' मतदान
राधानगरी तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायत जिल्ह्यातील सर्वात लहान ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. गावात 7 सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यामध्ये राजापूरसह हसनगावमधील सोपमारे वाडा, भिवाजीखोळ या दोन वाड्यांचा सुद्धा समावेश आहे. ग्रामपंचायतीचे एकूण 3 वार्ड आहेत. त्यामध्ये एकूण 250 मतदार आहेत. त्यातील 1 नंबरच्या वार्ड मधील 3 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे वार्ड क्रमांक 2 आणि 3 मधील एकूण 4 जागांसाठी मतदान होत आहे. वार्ड क्रमांक दोन मध्ये 71 मतदार आहेत. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला आहे. तर, वार्ड क्रमांक तीन मध्ये 83 मतदार आहेत त्यातल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 154 जण मतदानाचा अधिकार बजावणार होते. त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 11 पर्यंतच जवळपास 95 टक्क्यांहून अधिक मतदान झाले असून काही मतदार बाहेरगावी आहेत. ते सुद्धा येत आहेत. मात्र, गावात राहणाऱ्या सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावला आहे, असे माजी सरपंचांनी म्हटले आहे.
राजापूर ग्रामपंचायतीची स्थापना 1954 साली झाली. स्थापनेपासून पहिल्यांदाच गावात निवडणूक लागली आहे. एकूण 7 सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमधील 3 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र उर्वरित 4 जागांसाठी निवडणूक लागली आहे. शिवाजी मांजरे हे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत निवडणूक बिनविरोध होत आली आहे. मात्र पहिल्यांदाच निवडणूक लागली आहे त्यामुळे नागरिक आता कोणाला कौल देतात हे सुद्धा पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - नांदगांव तालुक्यातील पानेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवाराचे नाव गायब