कोल्हापूर - शहरात अनेक प्रभागांमध्ये कचऱ्याचा उठाव करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा नागरिक सत्कार करताना पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील गांधी मैदान परिसरात समर्थ परिवाराकडून हा अनोखा सत्कार करण्यात आला. यावेळी आठ ते दहा सफाई कर्मचाऱ्यांना नोटांचा आणि फुलांचा हार घालून त्यांना ओवाळण्यात आले.
सफाई कर्मचाऱ्यांना आजपर्यंत अशा प्रकारची वागणूक कधी मिळाली नाही. मात्र, अचानक समर्थ कुटुंबाने अगदी जिव्हाळ्याने आणि आपुलकीने या सर्वच कर्मचाऱ्यांचा आगळा-वेगळा सत्कार करून त्यांच्या कार्याला सलाम केला. विशेष म्हणजे, कोरोनाचे महाभयंकर संकट संपूर्ण जगावर आहे. मात्र, यामध्येही सफाई कर्मचारी रस्त्यावर उतरून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार होताना पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून सत्कार झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील वेगळाच आनंद पाहायला मिळाला. यावेळी राजू समर्थ, मेघा समर्थ, अंजली समर्थ, मंजित माने आदी उपस्थित होते.