कोल्हापूर - नाच रे मोरा आंब्याच्या वनात... नाच रे मोरा नाच... ग. दि. माडगूळकर यांचे हे बालगीत सर्वांनाच माहिती आहे. ग्रामीण भागात मोर नेहमीच पाहायला मिळतात. मात्र, शहरामध्ये मुलांना हे सर्व मोबाईलवरच पाहायला मिळते. अशात शहरातील मध्यवर्ती भागात जर मोर आले आणि नाचायला लागले तर त्याहून मोठा आनंद तो काय असेल? कोल्हापुरातील गोखले कॉलेज परिसरात राहाणाऱ्या एका देशपांडे कुटुंबालासुद्धा असाच अनुभव आज सकाळी मिळाला.
खरंतर मोर प्रामुख्याने जंगलात, डोंगराळ भागत, नदीकाठी आणि झाडाझुडपात आढळतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गोखले कॉलेज परिसरातील लक्ष्मीनगर येथे मोराचा आवाज आणि काहीवेळा मोर दिसत होते. अशात आजतर येथील नागरिकांना चक्क मोर नाचत असताना पाहण्याचा अनुभव घेता आला आहे. अथर्व देशपांडे यांनी त्यांच्या फ्लॅटमधूनच या मोराचे नाचतानाचे विलोभनीय दृश्य आपल्या कॅमेरात कैद केले. मन प्रसन्न करणारे हे दृश्य खास 'ईटीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी.