कोल्हापूर - पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाण्याची पातळी १ फुटांनी कमी झाली आहे. आता महामार्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापुरातील पूरस्थिती नियंत्रणात येणार आहे.
शहरात पावसाचा जोर कमी झालेला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी ५२.१ फुटांपर्यंत आलेली आहे. मात्र, पाण्याची पातळी धोका पातळीच्या खाली येण्यासाठी पुन्हा १० फूट पाणी कमी होणे गरजेचे आहे. शहरात शुक्रवारपासून पावसाचा जोर मंदावला असला तरी राधानगरी, गगनबावडा आणि आजरा भागात अद्यापही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे बंद झालेले राधानगरी धरणाचे स्वयंचलित ७ दरवाजांपैकी ५ दरवाजे रात्री उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात पूर ओसरायला सुरुवात झाली. मात्र, काही ठिकाणी अजूनही परिस्थिती गंभीर आहे. शिरोळ तालुक्यात सुद्धा महापुराने हाहाकार माजवला आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी एनडीआरएफ आणि नौदलाचे जवान पाठवण्यात आले आहे.