कोल्हापूर: देशभरातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या नद्यांमध्ये कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा समावेश झाल्यानंतरही गेल्या 35 वर्षाहून अधिक काळ पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याची आश्वासने आणि घोषणाच ऐकायला मिळाल्या, परिणामी कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदी आता जलपर्णीमुळे गुदमरत आहे. कोल्हापुरातील कुरुंदवाड येथील पंचगंगा नदीमध्ये वाढलेल्या जलपर्णीमुळे ही नदी आहे की, खेळाचे मैदान असा प्रश्न पडतो.
प्रदूषित नद्यांच्या यादीत पंचगंगा नदी: कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेली पंचगंगा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रदूषणाच्या जबड्यात अडकली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरामुळे कोल्हापूरची जगभरात ओळख आहे. मात्र शहरालगत असलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे भारतामध्ये प्रदूषित नद्यांच्या यादीत पंचगंगा नदीचा समावेश आहे. पंचगंगेला प्रदूषण मुक्त करण्यासाठी गेल्या काही वर्षात अनेक पावले उचलली गेली, मात्र या पावलांना गती मिळाली नाही. नदीतील दूषित पाण्याचा फटका नदीकाठच्या नागरिकांसह दुभत्या जनावरांनाही बसतो आहे. या पार्श्वभूमीवर पाणी दूषित करणाऱ्या सरकारी निमसरकारी संस्था, कारखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नदीला काळ्या ओढ्याचे स्वरूप: इचलकरंजी शहराच्या पुढे पंचगंगा नदी ही काळा ओढा म्हणूनच वाहते. हा ओढा काळाकभिन्न दिसत असतानाही नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करते. पूर्वी कोल्हापूर महापालिका हेच करत होती. पण आक्रमक आंदोलनामुळे त्या मानसिकतेत काहीसा बदल झाला. त्यातून सांडपाणी प्रकल्प उभारले गेले. पण त्या प्रकल्पांची क्षमता शंभर टक्के नसल्याने आजही मैलायुक्त पाणी नदीत मिसळते. या नदीचे पाणी जिल्ह्यातील सतरा लाख नागरिकांपर्यंत पोहोचते. त्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
पर्यावरण मंत्रांच्या आदेशाला केराची टोपली: न्यायालय, हरित लवाद आणि पर्यावरण मंत्र्यांनी अनेकदा पंचगंगेच्या प्रदूषण मुक्तीचे आदेश दिले पण, ते कागदावर राहत असल्याने पंचगंगा प्रदूषणयुक्तच राहिली. जोपर्यंत प्रदूषण नियंत्रणाचे सर्व नियम पाळले जात नाहीत. नदी काठच्या गावांमधील नागरिकांच्यात प्रबोधन होत नाही, तोपर्यंत पंचगंगेची गटारगंगा म्हणून असलेली ओळख कायम राहील. राष्ट्रीय हरित लवाद, पर्यावरण मंत्रालय यांच्या आदेशाला केराची टोपली मिळाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
स्वच्छतेची जबाबदारी सरकारची: इचलकरंजीतील ६८ खासगी उद्योगांसाठी सांडपाणी प्रकल्प उभारावेत असा एक मुद्दा पुढे आला. म्हणजे प्रदूषण करणार उद्योजक आणि स्वच्छ करण्याची जबाबदारी सरकारची, अशी ही अजब मागणी आहे. पंचगंगा नदी काठावर इचलकरंजीतील वस्त्रोद्योग, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील केमिकल युक्त सांडपाणी मिसळते, या सांडपाण्यामुळेच प्रदूषणात वाढ होत असून, प्रदूषण करणारे घटक त्याची जबाबदारी घेत नाहीत. यामुळे प्रदूषण करणार उद्योजक आणि स्वच्छतेची जबाबदारी मात्र सरकारची असा प्रकार समोर येतो.
नदीत मृत माश्यांचा खच: कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प आणि कदमवाडी या परिसरासह करवीर तालुक्यातील वळीवडे, रूकडी, गांधीनगरसह नदीकाठावर मृत माशांचे खच पाहायला मिळाले. नदीमध्ये पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने या माशांचा मृत्यू झाल्याचे पर्यावरण तज्ञ सांगतात. वाढत्या पंचगंगा प्रदूषणामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. जलपर्णीमुळे नदी झाली खेळाचे मैदान. केमिकल युक्त पाणी नदीत मिसळत असल्यामुळे पंचगंगा नदीत जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वी इचलकरंजी प्रशासनाने नदीतील जलपर्णीवर ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी केली. मात्र ही औषध फवारणी ही वादाच्या भोवऱ्यात सापडली, यामुळे जलपर्णीच्या विळख्यात सध्या पंचगंगा गुदमरत असल्याचे चित्र निर्माण झाली आहे.
हेही वाचा -