कोल्हापूर - शहरात आता 'खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर' ही मोहीम राबवली जाणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून ही मोहीम कोल्हापूर शहरात राबवली जाणार आहे. यासाठी 50 पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. शहरातील सर्वच स्वयंसेवी संस्थांची शनिवारी (दि. 26 डिसें.) सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा या कार्यालयात बैठक पार पडली त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
शहरातील सर्वच झाडे होणार खिळेमुक्त
कोल्हापुरातील अनेक झाडांवर विविध कंपन्यांनी, काही संस्थांनी, दुकानदारांनी आपल्या जाहिरातिसाठी खिळे ठोकून होर्डिंग लावले आहेत. आशा झाडांची संख्या या मोहिमेच्या माध्यमातून काढण्यात आली असून येत्या 3 जानेवारीला सर्वच झाडे खिळेमुक्त करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी म्हटले आहे.
शहरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
'खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर' या मोहिमेत शहरातील सर्वच स्वयंसेवी संस्था येत्या 3 जानेवारी रोजी एकत्र येणार आहेत. त्यामुळे या उपक्रमात शहरातील नागरिकांनाही सहभागी व्हायचे असेल तर यांनी सुद्धा आपल्या परिसरात स्वयंसेवी संस्थेसोबत योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
स्वयंसेवी संस्थांनी मानले सतेज पाटलांचे आभार
मागील दिवसांपासून शहरातील वृक्षप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था झाडे खिळेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, एकाच वेळी सर्वच स्वयंसेवी संस्थांसह वृक्षप्रेमी संस्थांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी एकत्र करून कोल्हापूर शहरातील सर्वच झाडे खिळेमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्या सर्वच संस्थांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे यावेळी आभार मानले.
हेही वाचा - अशोक चव्हाण, वडेट्टीवार अन् भुजबळांनी राजीनामा द्यावा - मराठा क्रांती मोर्चा
हेही वाचा - चंद्रकांतदादांचे विरोधक म्हणजे भाजप पक्षातीलच - सतेज पाटील