कोल्हापूर - अखेर कोरोना लसीची प्रतीक्षा संपली आहे. आज राज्यभरात कोरोना लसीकणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात 11 केंद्रांवर प्रत्येकी 100 प्रमाणे 1 हजार 100 लाभार्थ्यांना आज लस देण्यात येणार होती. मात्र जिल्ह्यात केवळ 52 टक्केच लसीकरण झाले आहे. म्हणजेच 1 हजार 100 पैकी केवळ 570 लाभार्थ्यांचेच लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे समुपदेशन करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांनी म्हंटले आहे.
कोल्हापूरमधील सेवा रुग्णालयात 86 टक्के लसीकरण
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 11 ठिकाणी लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये शहरात 5 आणि जिल्ह्यातील विविध भागात 6 केंद्रांचा समावेश आहे. या प्रत्येक केंद्रावर 100 प्रमाणे 1 हजार 100 लाभार्थ्यांना ही लस आज देण्यात येणार होती. मात्र प्रत्यक्षात 570 लाभार्थ्यांनीच लसीकरणाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील 11 केंद्रांपैकी कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात 100 पैकी 86 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
आजारी व्यक्तींचे लसीकरण नाही
लसीकरणापूर्वी संबंधित व्यक्तीची तपासणी करण्यात येत होती. ती व्यक्ती लसीकरणासाठी योग्य असेल तरच लसीकरण करण्यात येत होते, त्यामुळे ज्या व्यक्ती आजारी आहे, किंवा त्यांना लस देणे धोक्याचे आहे अशा व्यक्तींना आज लस देण्यात आलेली नाही, त्यांना लसीकरणासाठी नंतर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोल्हापुरात लसीकरणाची टक्केवारी कमी
कोल्हापुरात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच कमी लसीकरण झाले आहे. कोल्हापुरात केवळ 52 टक्के लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यांमध्ये 100 टक्के लसीकरण पार पडले आहे. शिवाय भंडारा 87 टक्के, अमरावती 80 टक्के, परभणी 78 टक्के तर बीड जिल्ह्यात 66 टक्के लसीकरण झाले आहे.