कोल्हापूर - शहरवासियांसाठी आज सकाळी दिलासादायक बातमी समोर आली आहे. साताऱ्याहून रुग्णवाहिकेतून अवैधरित्या प्रवास करून आलेल्या कसबा बावडा येथील वृद्ध महिलेचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. 14 दिवसानंतर घेतलेल्या पहिल्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीपीआर प्रशासनाला आज सकाळी हा अहवाल प्राप्त झाला असून अजून एक तपासणी झाल्यानंतर त्यांना कोरोनामुक्त घोषित केले जाईल.
जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना कोल्हापुरातल्या बावड्यातील कोरोनाग्रस्त वृद्ध महिला २८ मार्चला साताऱ्याहून कोल्हापूरात आल्या होत्या. लॉकडाऊन असूनही त्या कोल्हापूरात कशा आल्या याबाबत चौकशी केल्यानंतर त्या एका रुग्णवाहिकेतून आल्याचे समोर आले. नोंदणीकृत रुग्णवाहिकेमधून कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या सातारा ते कोल्हापूर प्रवासी वाहतूक झाल्याचे समजताच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांवर गुन्हा सुद्धा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
याच वृद्ध महिलेचा आज सकाळी कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या कोल्हापुरात दोघांना कोरोनामुक्त घोषित केले असून या वृद्ध महिलेचा दुसरा अहवाल सुद्धा निगेटीव्ह आल्यानंतर कोल्हापूरातील हा तिसरा रुग्ण कोरोनामुक्त रुग्ण असणार आहे.