कोल्हापूर - नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची यामुनाष्टक रूपात पूजा बांधण्यात आली आहे. आद्य शंकराचार्यांनी रचलेले यामुनाष्टक म्हणजे यमुनेची स्तुती. त्यांच्या तीर्थयात्रेच्या काळात त्यांनी ही यमुनेची आठ श्लोकांमध्ये स्तुती रचली असल्याचे म्हटले जाते.
गंगेप्रमाणेच यमुनेलाही हिंदू धर्मात वेगळे महत्त्व आहे. कृष्ण चरित्राशी यामुनेचा घनिष्ठ संबंध आहे. श्रीकृष्णाच्या महत्त्वाच्या लीलांची यमुना नदी साक्षी आहे. कालांतराने कृष्ण संप्रदायामध्ये यमुनेचे दैवत्व वाढीला लागून तिला समूर्त करण्यात आले. जसे गंगेचे वाहन मगर तसे यमुनेचे वाहन कासव मानले जाते. त्यानुसारच आजची ही पूजा उमेश उदगावकर, पुरुषोत्तम ठाणेकर आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली असल्याचे श्रीपूजक राधिका ठाणेकर यांनी सांगितले.