कोल्हापूर - वेगवेगळ्या 20 गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात आणि ट्रिपल मोक्कांतर्गत कारवाईमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेल्या कुख्यात आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आप्पा उर्फ सुभाष माने, पप्पू उर्फ सुहास किसन सोनवलकर या दोघांना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 2 पिस्तूलसह 3 राऊंड आणि 20 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
20 ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल -
आरोपी आप्पा उर्फ सुभाष माने याच्याविरोधात 20 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दरोडा, लूटमार, खंडणी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. मानेवर खारघर-नवी मुंबई, लोडोली-कोल्हापूर, राजगड-पुणे ग्रामीण या तीन ठिकाणी तीन मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच फलटणमध्ये सोन्याचे दुकान लुटताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकावर मानेने गोळीबार केल्याची माहिती बलकवडे यांनी दिली. तर, माने आणि पप्पू उर्फ सुहास सोनवलकर या दोघांनी त्यांच्या काही साथीदारांसह पोलिसांच्या वेशात राजगड पोलीस ठाणे हद्दीमध्ये बालाजी ज्वेलर्स या दुकानात गोळीबार केला होता, असे अनेक गंभीर गुन्हे आरोपींच्या नावावर दाखल असल्याचे बलकवडे यांनी नमूद केले.
1 लाख 67 लाखांचा मुद्देमाल जप्त -
कुख्यात आरोपी आप्पा उर्फ सुभाष माने आणि त्याचा साथीदार पप्पू उर्फ सुहास किसन सोनवलकर या दोघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्याकडून 2 पिस्तूल, 3 मॅगझीन, 20 जिवंत काडतूसांसह गाडी आणि मोबाईल असा एकूण 1 लाख 67 हजार 745 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - जीएसटीतून मिळणाऱ्या फायद्यासाठी ३९ कोटींची फसवणूक; पाच जणांना अटक