कोल्हापूर - एकीकडे संपूर्ण राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यात मात्र कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते. शिवाय मृत्यूंची संख्या सुद्धा सातत्याने वाढत चालली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली असून मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात कोल्हापूरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात सध्या 1 हजार 428 सक्रिय रुग्ण -
चाळीस लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 2 लाख 4 हजार 105 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 1 लाख 96 हजार 977 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. त्यातील 5 हजार 700 रुग्णांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ 1428 सक्रिय रुग्ण उरले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 96.50 टक्के इतका असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे. गेले अनेक दिवस कोरोनामुळे रुग्ण मृत्यूचे प्रमाण आणि रुग्ण संख्या आटोक्यात यावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न केले. आरोग्य यंत्रणा सुद्धा रात्रंदिवस कोरोना प्रादुर्भाव कसा कमी येईल यावर उपाययोजना करत होती. त्याचेच फलित म्हणून आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे समोर आले आहे.
येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या लाटेची भीती -
दरम्यान, कोरोना परिस्थितीमुळे कधीकाळी राज्यात अव्वल ठरलेल्या या कोल्हापूर जिल्ह्याने कोरोनाला हरवण्यासाठी नियोजनबद्धरीत्या प्रयत्न केले. जिल्हा प्रशासन महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणेच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आज कोल्हापूरला दिलासा मिळाला आहे. मात्र, यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, वैद्यकीय तज्ञांनी येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या लाटेचाही अंदाज वर्तविला आहे. त्यांच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे आता कोल्हापूर जिल्ह्याला न परवडणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर्वीप्रमाणेच स्वतःची जबाबदारी ओळखून सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करणे गरजेचे असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. शिवाय आगामी काळातील सणासुदीच्या दिवसात सुद्धा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून, विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन सुद्धा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा - अनिल देशमुख यांचे जावई आणि वकील सीबीआयच्या ताब्यात, नोंदवले जबाब