कोल्हापूर - जिल्ह्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आज (बुधवारी) आणखी एक एनडीआरएफचे पथक आणि लष्कराचे पथक कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहे. थोड्याच वेळात जिल्ह्यातील विशेषत: प्रयाग चिखली या पूरग्रस्त भागात स्थलांतरास सुरुवात होणार आहे. खराब वातावरणामुळे नौदलाचे विमान आणि गोवा कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापूरमध्ये पोहचू शकले नाही. पण ते सुद्धा कोल्हापूरमध्ये दाखल होईल.
प्रयाग चिखली, आंबेवाडीसह शिरोळ तालुक्यातील विविध गावांमधून सुमारे बाराशे व्यक्तींना मंगळवारी दिवसभरात सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. आज एनडीआरएफ आणि लष्कर असे १०६ जणांचे पथक कोल्हापुरात पोहचले आहे. महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे या दोन्ही पथकांना पुढे जाता आले नाही. थोड्याच वेळात ही दोन्ही पथके पूरग्रस्त भागामध्ये जाणार आहेत.
नौदलाच्या माध्यमातूनही 5 बोटी आणि पथके उपलब्ध करुन देण्यात येणार होती. मुंबईहून विमान कोल्हापूरकडे येण्यासाठी निघाले होते. मात्र, खराब वातावरणामुळे विमानाला माघारी जावे लागले. आज हवाईदलाच्या विमानाने हे पथक कोल्हापूरमध्ये दाखल होईल. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्याबरोबरच त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे. कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर आज गोव्याहून कोल्हापूरकडे निघाले होते, ते रत्नागिरीपर्यंत पोहचले, पण खराब वातावरणामुळे पुढे येऊ शकले नाही. हे हेलिकॉप्टरही एअरलिफ्टिंगसाठी आज कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे.