कोल्हापूर - राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यात भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे आता भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणत असतील की, 'ईव्हीएमवर मतदान झाले असते तर बरे झाले असते,' अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. भाजपाने पराभवाचे चिंतन करावे, असा सल्लाही मुश्रीफ यांनी दिला आहे. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपाला महाराष्ट्रानेच दिले उत्तर -
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणत होते, महाविकास आघाडीच्या एक वर्षातील कारभारावर लोक नाराज आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला हरवण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, झाले उलटच भाजपाने कोरोना काळात, सुशांत सिंह आणि कंगना राणौत प्रकरणात महाराष्ट्राचा अपमान केला. त्याला महाराष्ट्रानेच उत्तर दिले आहे. जनतेनेच त्यांना चपराक दिल्याचे मुश्रीफ म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी माझी माफी मागितली पाहिजे -
कोणावरही टीका केली की मुश्रीफ उत्तर का देतात? असे चंद्रकांत पाटील यांनी विचारले होते. त्याला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले, भाजपा सरकार सत्तेचा वारंवार दुरुपयोग करत आले आहे. आपल्या विरोधात बोलणार्याला धडा शिकवणे, सुडाचे राजकारण करणे यातच भाजपाला रस आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात सुद्धा सात्विक राग आहे. चंद्रकांत पाटील यांनी मला राजकीय आणि सामाजिक जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला. याबाबतच माझ्या मनात त्यांच्याबद्दल सात्विक राग आहे. त्यामुळे त्यांनी एकदा माफी मागून तो संपवला पाहिजे, असेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी म्हटले आहे.
बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची वेळ आली आहे -
अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातसुद्धा ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपरवर मतदान घेतले जात आहे. लोकांच्या मनामध्ये सुद्धा सातत्याने याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रक्रियेमध्ये मतमोजणीसाठी वेळ लागतो मान्य आहे. मात्र, लोकांच्या मनातील शंका यामुळे दूर होतात. त्यामुळे आता बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची वेळ आली असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीचा चार जागांवर विजय -
महाविकास आघाडी निर्माण झाल्यापासून तीन पक्षांची एकत्रित पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये भाजपासमोर महाविकास आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले होते. चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा भाजपा एकटा पक्ष सर्वांना पुरून उरेल, असेही म्हटले होते. मात्र, विधानपरिषदेच्या निकालानंतर वेगळे चित्र पहायला मिळाले असून एकूण 6 जागांपैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे हे मोठे यश मानले जात आहे.