कोल्हापूर - कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातून बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह त्याच्या घरापासून 100 मीटर अंतरावरच आढळला आहे. आरव राकेश केसरे असे या बालकाचे नाव आहे. गेल्या 2 दिवसांपासून तो घरातून बेपत्ता झाला होता. मात्र, आज सकाळी त्याच्या घरापासून काही अंतरावरच त्याचा मृतदेह मिळाला असल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. घटनेचा तपास त्वरीत करण्याची मागणी सुद्धा आता ग्रामस्थांकडून होत आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणखी एका बालकाचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता. शिवाय त्याच्या नातेवाईकांनी नरबळीचा संशय सुद्धा व्यक्त केला होता. त्यानंतर आता ही दुसरी घटना घडल्याने आरवचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तत्काळ तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी केली जात आहे. गंभीर बाब म्हणजे आरवच्या मृतदेहावर हळद, कुंकु आणि गुलाल टाकण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
तीन ऑक्टोबर रोजी झाला होता बेपत्ता -
मिळालेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील कापशी गावातील आरव राकेश केसरे हा त्याच्या राहत्या घरातून तीन ऑक्टोबर रोजी गायब झाला होता. घरच्यांनी त्याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आरवला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कोणी पाहिल्याचे काहीही समजले नाही. मात्र, आज सकाळी आवरचा मृतदेह त्याच्या घरापासून केवळ 100 मीटर अंतरावर एका जागेवर आढळला. दोन दिवसांपासून बालकाचा शोध सुरू होता. मात्र, त्याचा मृतदेहच सापडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.
बालकाच्या हत्येची जिल्ह्यातली दुसरी घटना -
कागल तालुक्यातील सोनाळी गावातील एका सात वर्षीय बालकाचा सुद्धा ऑगस्ट महिन्यात अशाच पद्धतीने अपहरण करून खून करण्यात आला होता. त्यानंतर हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय ग्रामस्थांसह संबंधित मुलाच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा तशाच पद्धतीने बालकाचा खून झाला असून यामागचे नेमके कारण काय याचा पोलिसांनी तत्काळ शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. शिवाय दोषीचा तत्काळ शोध घेऊन त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी सुद्धा मागणी होत आहे.
हेही वाचा - मुंबईच्या प्रियदर्शनी पार्क येथील समुद्रात 2 मुले बेपत्ता; शोध मोहीम सुरू