कोल्हापूर - ग्राहकांनी वीज बिल भरावे म्हणून महावितरणने अनोखा फंडा शोधत चक्क गाण्याची ऑडिओ क्लिप रिलीज केली आहे. या गाण्याच्या माध्यमातून नागरिकांना वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात जवळपास 180 ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात आली होती. त्यानंतर आता गाण्याच्या माध्यमातूनच ग्राहकांना साद घालण्याचा महावितरणने प्रयत्न केला आहे.
वीज बिल कंपनीने रिलीज केलेल्या गाण्याचे सोनू तुला वीज बिल भरायचे नाही का? असे टायटल आहे. या गाण्याद्वारे ग्राहकांना वीज किती महत्त्वाचे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ग्राहक वीज बिल भरण्यासाठी मागेपुढे करतात असे म्हटले आहे. सध्या, ही गाण्याची क्लिप जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल होत आहे.
हेही वाचा-वीज बिल कपात करण्याचे राज्य सरकारचे आश्वासन हवेतच!
जिल्ह्यात जवळपास दीड कोटींहून अधिकची वसुली
अधिवेशन सुरू होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज कनेक्शन तोडण्यावर स्थगिती दिली होती. मात्र, अधिवेशन संपताच पुन्हा वीज बिल वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास 200 नागरिकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहेत. मात्र, कारवाईच्या भीतीने अनेकांनी वीज बिल भरलीसुद्धा आहेत. जवळपास 2 हजारांहून अधिक ग्राहकांनी वीज बिल भरले आहेत. तर दीड कोटी रुपयांची वसुली जिल्ह्यात झाली आहे.
हेही वाचा-थकीत वीजबिले भरा; वीज जोडण्या खंडित करण्याच्या मोहिमेवरील स्थगिती उठवली
महावितरणकडून रिलीज केलेल्या गाण्यामध्ये काय म्हटले आहे ?
सोनू तुला लाईट बिल भरायचे नाय का ? सोनू आहे राजाची शान, सोनूला गावात मान, सोनूचा मोबाईल भारी, सोनूची गाडी पण भारी... सोनू आमचा ग्राहक लाडका, आम्ही त्याला वीज देतो बरं का?, सोनूची कॉलर टाईट, वीज बिल भरायला वाटतंय वाईट, सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का? सोनू आमचा आंघोळीला जातो. गीझरला लागते लाईट, मात्र वीज बिल भरायला वाटते वाईट.. सोनू तुला वीज बिल भरायचं नाही का?
वीज दरात २ टक्क्यांनी कपात-
वीज बिलांच्या मुद्द्यावरून राज्यात रणकंदन सुरू असताना विद्युत नियामक आयोगाने राज्यातील ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यात 1 एप्रिलपासून वीज दरात 2 टक्क्यांनी कपात करण्याचा महत्वाचा निर्णय विद्युत नियामक आयोगाने घेतला आहे. सामान्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.