कोल्हापूर - अनेक मराठा तरुणांना नियुक्तीसाठी ऑर्डर मिळाली आहे. मात्र, कामावर घेतले जात नाही. आरक्षण मिळेलच. मात्र, तुमच्या हातात जे आहे ते आधी करा. याला चेतावणी समजा अगर विनंती, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
नोकरीबाबत वकिलांनीही सरकारला जाब विचारावा. शिवाय 2014 ते 2020पर्यंत नियुक्त्या का झाल्या नाहीत? यावर सरकार विरोधात याचिका दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच आरक्षणाच्या लढ्यासंदर्भात कोल्हापूरने महाराष्ट्राला दिशा द्यावी, असेदेखील संभाजीराजे म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी कोल्हापूरात आज (रविवारी) न्यायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. परिषदेला अॅड. श्रीराम पिंगळे, अॅड. आशिष गायकवाड, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, प्रा. जयंत पाटील, अॅड. रणजित गावडे, जयेश कदम, दिलीप पाटील, दिलीप देसाई तसेच सकल मराठा समाज आणि जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. परिषदेत कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील वकीलसुद्धा उपस्थित राहिले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची न्यायिक लढाई नेमकी कशी लढावी? यासंदर्भात येथील लोणार वसाहतीतील महालक्ष्मी बँकवेट हॉलवर या न्यायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी संभाजीराजे म्हणाले, वकिलांच्या कार्यावर माझा विश्वास आहे. मात्र, सरकारने यंत्रणा तयार ठेवली पाहिजे. मागास आयोगाने आपल्याला मागास जाहीर केले आहे. हातात सोन्याचे बिस्कीट(ईएसबीसी) असताना तुम्ही आर्थिक मागासची (इडब्लूएस) अपेक्षा का करता? उद्या जर इडब्लूएस घेतले तर सर्वोच्च न्यायालय विचारेल. तुम्हाला अगोदर आरक्षण असताना तुम्ही ईएसबीसी आरक्षण का मागता? त्यामुळे समाजाची भूमिका मराठा आरक्षण मिळवणे हेच पाहिजे. जे लोक इडब्लूएसचे समर्थन करतात त्यांनी लिहून द्यावे की, मराठा आरक्षणाला फटका बसणार नाही, असे आवाहनही खासदार संभाजीराजे यांनी यावेली केले.
ज्या नामवंत मराठा वकिलांनी समाजासाठी वेळ दिला त्यांना या प्रक्रियेत सामावुन घ्यायला हवे. महाधिवक्ता सांगतील त्याच वकिलांची नेमणूक का? असाही त्यांनी उपस्थित केला. आरक्षणासाठी लढा सुरूच आहे. मात्र, निर्णय न्यायप्रविष्ठ आहे. अशावेळी तज्ज्ञांचे मत विचारात घेणे गरजेचे आहे. सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयन्त आहेच. मात्र, कोणत्या मार्गाने लढाई लढवता येईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केवळ मराठा समाजाला एकत्र आणणे माझे ध्येय नाही तर बहुजन समाजाला सोबत एकत्र घेऊन जाणे माझा विचार आहे. त्यामुळे बहुजन समाजाने आवाज उठवणे गरजेचे आहे. आरक्षणाची तिसरी लढाई ही न्यायिक आहे, असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.
समाजाचा वकिलांवर विश्वास आहे. समाजाला ताकद मिळवण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. त्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. मराठा समाज सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने ओबीसी आरक्षणाला समकक्ष आहे. म्हणून आरक्षण मिळण्यास पात्र आहे, असे मत अॅड. आशिष गायकवाड यांनी व्यक्त केले. मराठा समाजातील तरुणांना यूपीएससी, एमपीएससीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आणि लाभ मिळवण्यासाठी मराठा आरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. आरक्षण मिळवण्यासाठी जातीने प्रयत्न केले पाहिजेत, असे अॅड. आशिष गायकवाड यांनी स्पष्ट केले.