कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी स्वतःचे घर होम क्वारंटाईनसाठी दिले आहे. कोल्हापुरातल्या रुकडी येथे त्यांचे घर आहे. एखादा व्यक्ती परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात येत असेल तर त्याला संबंधित ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण करण्यात येते. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला तर त्याला घरी सोडण्यात येते. त्यामुळे काही दिवस त्याला अलगीकरणात राहावे लागते. त्यासाठी धैर्यशील माने यांनी त्यांचे घर दिले आहे. परजिल्ह्यातून आलेला नागरिक येथे विलगीकरणात राहू शकेल.
खासदारांच्या या अभिनव कल्पनेनंतर प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय ग्रामस्तरीय समितीच्या प्रभावी कामाला मदत होणार असून कुटुंबाला आणि पर्यायाने गावाला सुद्धा कोणताच धोका होणार नाही. अशा पद्धतीमुळे अलगीकरणाच्या तंतोतंत पालनास मदत होईल, असे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.