कोल्हापूर - वादग्रस्त झेंड्याविरोधात मराठी भाषिक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्याच वादग्रस्त झेंड्याविरोधात येत्या 8 मार्चला बेळगावमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, कोणत्याही परिस्थितीत बेळगाव महापालिकेसमोरील लाल पिवळा झेंडा काढण्यास भाग पाडू, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र बेळगाव पोलीस शिवसेनेला परवानगी देणार का ? हे सुद्धा पाहावे लागणार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
कर्नाटकमधील कन्नड संघटनेने मराठी भाषिकांना डीवचण्यासाठी बेळगाव महापालिकेसमोर लाल पिवळा झेंडा लावला आहे. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र निषेध व्यक्त करत हा झेंडा काढण्याची मागणी केली आहे. शिवाय 21 जानेवारी रोजी याबाबत भव्य मोर्चा सुद्धा काढण्यात येणार होता, मात्र पोलिसांनी त्यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारली होती. शिवसेनेने देखील यापूर्वी बेळगावच्या हद्दीत जाऊन भगवा फडकवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या विषयामुळे वातावरण तापले असून, येत्या 8 मार्च रोजी मराठी भाषिकांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी म्हंटले आहे.
याही वेळेला परवानगी नाकारली तर 'गनिमी कावा'
गेल्या वेळी कन्नड संघटनांकडून झेंडा फडकवण्यात आल्यानंतर, त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने देखील बेळगाव हद्दीतील शिणोली गावात जाऊन भगवा फडकवला होता. मात्र आता 8 मार्चला जर पोलिसांनी परवानगी नाकारली तर आम्ही गनिमी काव्याने बेळगावमध्ये प्रवेश करू, व कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवा फडकवू असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.