कोल्हापूर: कडक उन्हाळ्यानंतर आकाशाकडे नजरा लावून बसलेल्या कोल्हापूरकरांना शनिवारी पावसात भिजण्याचा आनंद मिळाला. कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या बहुतांशी भागात शनिवारी मान्सूनधारा बरसल्या. दिवसभर पावसाने हजेरी लावली. तर धरण क्षेत्रातही चांगला पाऊस सुरू झाला. यापुढे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पाऊस आल्याने कोल्हापूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून थंडावा निर्माण झाला आहे.
मान्सूनचे आगमन - जून महिना अर्धा संपला तरी अजूनही मान्सूनचे आगमन न झाल्याने कोल्हापूरकर चिंतेत होते. पंचगंगा नदी तसेच राधानगरी धरणातील पाणी देखील कमी झाल्याने शहरात पाणी पाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे शासनाने उपसा बंदीचे देखील आदेश जारी केले होते. यामुळे बळीराजा चिंतेत होता. अनेक ठिकाणी पेरण्या लांबल्या तर काही ठिकाणी पिकं वाळू लागली होती. यामुळे बळीराजा आकाशाकडे नजर ठेवून बसला होता. अशा परिस्थितीत अखेर शुक्रवारी मध्यरात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सून दाखल झाला आणि शनिवारी पहाटेपासून शहर आणि परिसरात दमदार पाऊस सुरू झाला.
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस - शेतकऱ्यांसह कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला असून दिवसभर पावसाची रिपरीप सुरू होती. शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली असून राधानगरी धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस सुरू झाला आहे. जिल्ह्याचा सर्वच धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात चांगल्या पावसाची नोंद झाली असून कुंभी, घटप्रभा आणि जांबरे प्रकल्पात दमदार पाऊस झाला.
राऊतवाडी धबधबा प्रवाहित - राधानगरी धरण परिसरात ६० मि.मी. कासारी परिसरात ५१ मि.मी.,कोदे परिसरात ३६ मि.मी., पाटगांव परिसरात २८ मि.मी. पाऊस झाला आहे. अन्य धरण परिसरातही चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. तर राधानगरी धरण परिसरातील प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा देखील पहिल्याच पावसात प्रवाहित झाला आहे. शनिवार आणि रविवार वीकेंडला पर्यटकांच्या पाऊले आता राऊतवाडी धबधब्याकडे वळू लागले आहेत. येत्या काही दिवसात असाच पाऊस सुरू राहिला तर धबधबा मोठ्या प्रमाणात वाहू लागेल आणि राऊतवाडी धबधब्याचे खरं सौंदर्य पर्यटकांना पाहता येईल.
हेही वाचा -