गोंदिया - एक पाळीव श्वान छोट्या मुलीचा चावा घेत असल्याचे दिसताच पीडित महिलेने त्या पाळीव श्वानाला दगड मारून पळविले. मात्र त्या श्वानाच्या मालकाने याचा राग मनात घेत चक्क एक महिन्यानंतर त्या महिलेचा विनयभंग करत त्यांच्या कपड्याच्या दुकानाला आग लावली. ऋतिक विजय मेश्राम (२५ वर्ष रा. आंबेडकर चौक गोंविंद पूर) असे आरोपीचे नाव आहे.
एका महिन्याआधी आरोपीचा पाळीव कुत्रा हा पीडित महिलेच्या लहान मुलीच्या अंगावर येत असल्याने त्या महिलेने त्या कुत्राला दगड मारून पळविले होते. त्यावरून आरोपीने या महिलेशी वाद घातला होता. मात्र एक महिन्यापूर्वी झालेल्या त्या किरकोळ वादातून आरोपीने १० डिसेंबर रोजी रात्री ती महिला आपल्या घरी असताना तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला मारहाण करायला सुरूवात केली. त्या महिलेने आरडाओरड केल्यामुळे पती मदतीसाठी धावुन आला. त्यांनाही आरोपीने मारहाण केली. आरोपी ऋतिक तिथुन निघाल्यावर त्याने त्यां महिलेचे कापडाचे दुकानात पेट्रोल ओतून पेटवले. परिसरातील लोकांनी आग लागल्याचे कळताच आग विझवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्या आगीत त्या दुकानाचे ७० हजारांचे नुकसान झाले. आरोपीविरुध्द गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ४५२, ४३६, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.