कोल्हापूर - रश्मी शुक्ला या अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या. त्यांनी अनेक अधिकाऱ्यांना यासाठी कामाला लावले होते. कोट्यावधींची ऑफर त्या अपक्ष आमदारांना देत होत्या. पोलीस अधिकाऱ्यांचे हे कृत्य अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंग प्रकरणासोबतच, शुक्ला ज्या अपक्ष आमदारांना संपर्कात राहून ऑफर देत होत्या, त्या आमदारांची देखील चौकशी करावी अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.
'सीडीआर जप्त करून ते तपासणे गरजेचे'
काही व्यक्ती समाजविघातक कृत्य करत असल्याचा संशय होता. त्यामुळे सीताराम कुंटे यांनी शुक्ला यांना फोन टॅपिंगची परवानगी दिली होती. मात्र मिळालेल्या परवानगीचा रश्मी शुक्ला यांनी गैरवापर केला. त्यांनी थेट आमदारांचेच फोन टॅप केले, असा आरोप यावेळी मुश्रीफ यांनी केला आहे. 24 ऑक्टोबर 2019 ते 24 नोव्हेंबर 2019 पर्यंत शुक्ला यांच्या फोनचे सीडीआर जप्त करून, त्यांचे अपक्ष आमदारांसोबत झालेलं संभाषण तपासावे असंही यावेळी मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
फडणवीसांनी माफी मागावी
यावेळी मुश्रीफ म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी एक अहवाल घेऊन मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. शिवाय मोठ्या थाटात त्यांनी हा अहवाल घेऊन दिल्लीला चाललो आहे सांगत गृहसचिवांना तो दिला. मात्र अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही हे सिद्ध झाले आहे. त्यानंतर देशाचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे. फडणवीस म्हणतात लूज बॉल आला तर सीमेपार टोला देतो मात्र त्यांचा एकही बॉल सीमेपार गेला नाहीये. याउलट ते झेलबाद झाले असा टोला या परत्रकार परिषदेमध्ये मुश्रीफ यांनी लगावला आहे.
मनसुख हिरेन प्रकरणावर प्रश्नचिन्ह
आंबानींच्या घरासमोर कोणी स्फोटके ठेवली तसेच मनसुख हिरेन यांची हत्या कोणी केली हे तपासणे गरजेचे आहे. हा तपास चुकीच्या दिशेने जावा यासाठी विरोधी पक्षकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र एटीएसने खरा तपास केला असता, तर खरे मारेकरी समोर आले असते. आंबानींच्या घरासमोर स्फोटके कोणी ठेवली? हिरेन यांची हत्या कोणी केली? याचा शोध घेतला पाहिजे असेही मुश्रीफ यांनी यावेळी म्हटले.
हेही वाचा - बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, बघा खासदार नवनीत राणा यांची खास मुलाखत