कोल्हापूर - कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील नेहमीच समाजकार्यात अग्रेसर राहिले आहेत. सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करता कोरोना काळात आपले योगदान दिले आहे. आता तर त्यांनी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर बँकच सुरू केली आहे. या बँकेमुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. नुकतेच त्यांनी हा नवीन उपक्रम सुरू केला आहे.
जिल्ह्यातील अनेक कोरोनामुक्त रुग्ण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. यातील अनेकांना कोरोनामुक्त होऊन सुद्धा ऑक्सिजन देण्याची गरज असते. मात्र भाड्याने ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेऊन उपचार घेणे सर्वसामान्य रुग्णांना न परवडणारे आहे. त्यामुळेच ज्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरची गरज आहे त्यांच्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी मोफत सोय करून दिली आहे. या अभिनव उपक्रमाला 'ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर बँक' असे नाव देण्यात आले आहे. जवळपास 51 ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर सद्या सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गरजूंना अजिंक्यतारा कार्यालयातून हे ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे.
असा असेल हा उपक्रम
ज्या रुग्णांना डॉक्टरांनी ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरद्वारे ऑक्सिजन द्यायला सांगितले आहे. त्यांनी याबाबतचे डॉक्टरांचे पत्र घेऊन यावे. शिवाय रुग्णाचे आधार कार्डही आवश्यक असणार आहे. जोपर्यंत रुग्णाला ऑक्सिजनची गरज असेल तोपर्यंत ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर घरी घेऊन जाऊ शकता. वापरून झाल्यानंतर पुन्हा परत देऊन तेच मशीन दुसऱ्या रुग्णांसाठी ते देण्यात येणार आहे. दरम्यान, प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांना हे मशीन कसे वापरायचे आहे, याबाबत मार्गदर्शन सुद्धा केले जाणार असून याचा एक व्हिडिओ सुद्धा दिला जाणार आहे.
आरोग्य राज्यमंत्र्यांनी केले अभिनव उपक्रमाचे कौतुक
कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात ही ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर बँक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार प्रकाश आबीटकर आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य राज्यमंत्री यांच्या हस्ते एका रुग्णाच्या नातेवाईकांना मशीन देण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छाही दिल्या. शिवाय अनेक रुग्णांना याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -कोरोनाकाळातील कामाबद्दल अंगणवाडी, आशा सेविकांच्या कामाला मुजरा- मुख्यमंत्री